पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचे २० रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन रात्री ३-४ वाजेपर्यंत पुरेल एवढेच आहे. साहेब मदत करा असा फोन आला आणि एकच पळापळ सुरू झाली. मात्र मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले आणि महापालिका आयुक्त राजेश पाटील तसेच सर्वच मदतीचे हात ‘त्या’ रूग्णांसाठी देवदूत ठरले.. शर्तीच्या प्रयत्नांनंतर पहाटे ४ वाजता ऑक्सिजनचा पुरवठा हॉस्पिटलला झाला आणि मोठा अनर्थ टळला..!
दापोडीतील स्नेहबंध हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या २० रूग्णांवर उपचार सुरू होते. मात्र हॉस्पिटलमधील ऑक्सिजनचा पुरवठा रात्री ३-४ वाजेपर्यंत पुरेल एवढाच शिल्लक राहिला होता. कुठूनही व्यवस्था होत नव्हती. तेव्हा रात्री दिड वाजता मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांना त्यांचेे मित्र राहुल बाळापुरे यांचा फोन आला. काहीही करा हॉस्पिटलला ऑक्सिजन द्या, अन्यथा मोठा अनर्थ होईल अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर चिखले यांनी लगेच रात्री २ वाजता महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केली. आयुक्तांनी ऑटोक्लटर मधून रात्रीत ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दापोडी येथे आमचे स्नेहबंध हॉस्पिटल आहे. येथे २० कोरोनाचे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. गेले २ दिवस ऑक्सिजन पुरवठा कमी झाला आहे. दररोज आम्हाला ६० ते ७० ऑक्सिजनचे सिलेंडर लागतात. परंतू सप्लायरला रॉ मटेरियल मिळत नसल्याने ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय. काल पहाटे ३-४ वाजेपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन होता. ७ ते ८ रूग्ण हे क्रिटीकल परिस्थितीत होते. त्यामुळे ऑक्सिजनसाठी आम्ही सर्वत्र प्रयत्न करत होतो. मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांच्या प्रयत्नामुळे महापालिकेच्या ऑटोक्लस्टरमधून ऑक्सिजनचे १२ सिलेंडर पहाटे ४ वाजता आम्हाला मिळाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
डॉ. सी.के. काळे – स्नेहबंध हॉस्पिटल, दापोडी.
रूग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज असल्याचा फोन आला. तात्काळ आयुक्त राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी देखील क्षणाचाही विलंब न करता ऑटो क्लस्टरमधून ऑक्सिजन पहाटे ४ वाजता अवघ्या दोन तासात उपलब्ध करून दिला. वेळेत रूग्णांना ऑक्सिजन पोहचवू शकलो याचं समाधान आहे. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता..!
सचिन चिखले : मनसे – शहराध्यक्ष, नगरसेवक.