पिंपरी (Pclive7.com):- आज राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. यासाठी अनेक कलाकार मंडळी देखील बोटावर शाई लावून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र हिने आज सोशल मीडियावर मतदानाविषयी आलेला एक वाईट अनुभव शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
चिंचवड मध्ये राहत असलेल्या सावनी रवींद्र हिने प्रयत्न करुनही तिला मतदान करता आले नाही, हे अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटले आहे. सावनीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “गेले अनेक दिवस सर्व ऑनलाइन पोर्टलवर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. शेवटी आज मतदान केंद्रावर जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला. तरीही नाव सापडले नाही. (ज्या ठिकाणी मी गेली अनेक वर्षे मतदान करत आहे त्याच ठिकाणी) आमच्या घरातील बाकी सर्व सदस्यांची नावं आहेत, पण माझे नाही. या बद्दल स्वतः वोटिंग ऑफिसरची त्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन AED पर्यायाने वोट करू शकते का? याबद्दल विचारणा केली, त्यांनी नकार दिल्याने मत न देताच परत यावे लागले.”
यापूर्वी अनेक वेळा मतदान करून देखील यावेळेस मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावता आला नाही हे अत्यंत खेदजनक असल्याचे सावनी रविंद्र हिने म्हटले आहे.