पिंपरी (Pclive7.com):- इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी तब्बल ४३०.७५ कोटींच्या निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळी मंजुरी देण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या आर्थिक विषयाला ऐनवेळी मंजुरी देण्यामागे नेमके काय कारण, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. मात्र, विरोध डावलत हा विषय मंजूर करण्यात आला.

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली निविदा प्रक्रिया अचानक अंतिम टप्प्यात आणून मंजुरीसाठी मांडण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रियेवर संशय व्यक्त करण्यात आला. विरोधी सदस्यांनी हा निर्णय घाईघाईत घेतल्याचा आरोप करत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत त्यांच्या सर्व कामांची आणि संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली. “प्रत्येक मोठा विषय आयत्यावेळीच का आणला जातो? यामागे काहीतरी संशयास्पद आहे,” असा आरोप त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य संदीप वाघेरे यांनीही निविदा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत गुजरातमधील कंपनीला प्राधान्य दिल्याचा आरोप केला. “महाराष्ट्रातील कंपन्या अपात्र ठरतात आणि बाहेरील कंपनीला काम मिळते, यामागे रिंग असल्याचा संशय आहे,” असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, मूळा नदी सुधारणा प्रकल्पाचे काम करणारी बी. जी. शिर्के कंपनीही या निविदेत अपात्र ठरल्याने विरोधकांनी संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी हा विषय ७ जुलै रोजी होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तातडीने मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. त्यांच्या मते, या प्रकल्पामुळे इंद्रायणी नदीचे प्रदूषण कमी होऊन नदी संवर्धनाला चालना मिळणार आहे.




















Join Our Whatsapp Group