पिंपरी (Pclive7.com):- सिक्युरिटी व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देत तीन लाख रुपयांची खंडणी स्वीकारणाऱ्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून रोख रक्कम, वाहन व मोबाईल असा एकूण ११ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी सांगवी येथील सिक्युरिटी व्यवसायिक श्रीकांत बाबर व कंपनीतील सुपरवायझर संदीप कणसे यांना आरोपी महेश सखाराम शिरोळे (रा.मेदनकरवाडी, खेड) याने फोन करून व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिली होती. तसेच व्यवसाय चालवायचा असेल तर ३ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास व्यवसाय उद्ध्वस्त करून खल्लास करण्याची धमकी आरोपीने दिली होती.

या प्रकरणाची माहिती मिळताच खंडणी विरोधी पथकाने सापळा रचला. तक्रारदारांच्या सहकार्याने भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल तयार करून आरोपीला देण्यात आले. आरोपी खंडणीची रक्कम स्वीकारत असताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. आरोपीकडून ३ लाख रुपयांची खंडणीची रक्कम, एक चारचाकी वाहन व मोबाईल फोन असा एकूण ११ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांच्या नेतृत्वाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अमर राऊत, सुनिल कानगुडे, प्रदिप पोटे, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, गणेश गिरीगोसावी, चंद्रकांत जाधव, किरण जाधव, संदिप गंगावणे, निलेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.




















Join Our Whatsapp Group