पिंपरी (Pclive7.com):- रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे. याअगोदर तीन जण अटकेत आहेत. डॉक्टर चालवत असलेल्या हॉस्पिटलच्या नावे प्राप्त झालेले इंजेक्शन डॉक्टर काळ्याबाजारात विकत असल्याचे समोर आले आहे.
चिंचवडमधील ओनेक्स व थेरगावातील क्रिस्टल हॉस्पिटल चालविणारा सचिन रघुनाथ पांचाळ असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. तर याअगोदर क्रिस्टल हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्टाफमधील कृष्णा रामराव पाटील, ओनेक्स हॉस्पिटलमधील डिलेव्हरी बॉय निखिल केशव नेहरकर तसेच आयुश्री मेडिकलचा चालक केमिस्ट शशिकांत रघुनाथ पांचाळ यांना अटक केली आहे.
९ मे रोजी काळेवाडी फाटा येथे वाकड पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीदरम्यान आरोपी कृष्णा व निखिल यांच्याकडे दोन रेमडेसिव्हिरची इंजेक्शन आढळून आली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता शशिकांत पांचाळ याच्या सांगण्यावरून ते इंजेक्शन विकण्यासाठी जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी पांचाळला ताब्यात घेऊन त्याच्या मोटारीची तपासणी केली असता सीटखाली तब्बल १९ इंजेक्शन सापडली.
याप्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्याकडे केलेल्या अधिक तपासात हे २१ इंजेक्शन ओनेक्स व क्रिस्टल हॉस्पिटल चालविणारा डॉक्टर सचिन पांचाळ याने ओनेक्स हॉस्पिटल संलग्न आयुश्री मेडिकल व क्रिस्टल हॉस्पिटलचे इनहाऊस गोदावरी मेडिकल येथून दोन्ही हॉस्पिटलच्या नावाने प्राप्त केल्याचे समोर आले.
सचिन पांचाळ याने हे इंजेक्शन त्याचा भाऊ शशिकांत पांचाळ याच्या मध्यस्थीने तसेच कृष्णा पाटील व निखिल नेहरकर यांच्या मार्फत काळ्याबाजारात विकण्याचे नियोजन केले. अशाप्रकारे सचिन याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने वाकड पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
























Join Our Whatsapp Group