पिंपरी (Pclive7.com):- मोशी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची जागा अपुरी पडणार आहे. त्यामुळे या स्मारकाची जागा बदलण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोर्हाडेवाडी विनायकनगर मोशी येथे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय स्मारक होत आहे. हि आपल्या पिंपरी चिंचवडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा गौरव संपूर्ण जगात होतो. त्यांच्या पराक्रमाचे व कर्तृत्वाचे अनेक दाखले आहेत. संभाजी महाराजांच्या चरित्रातून अनेकांना प्रेरणा मिळते त्यामुळे या परिसरात उभ्या राहणाऱ्या या स्मारकाचे स्वागतच आहे.
परंतु या स्मारकासाठी निवडली गेलेली जागा हि तिन्ही बाजूंनी झाकून गेलेली असून सदर जागेचे क्षेत्र अत्यंत कमी आहे. याठिकाणी दोन्ही बाजूंना असलेल्या टोलेजंग १२ मजली उंच इमारतींमुळे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा पुर्ण झाकोळला जाणार आहे. यासाठी जगभरातून व देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक स्मारक पाहण्यासाठी येतील त्या दृष्टीकोनातून सदर स्मारकामध्ये उद्यान, संग्रहालय, प्रसाधनगृह, गेस्ट हाऊस, वॉकींग ट्रॅक येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांसाठी पार्कींग व्यवस्था सुरक्षा व्यवस्थेसाठी सुसज्ज यंत्रणा अशा अनेक सोयी सुविधा कराव्या लागणार असल्याने सदरची जागा अपुरी आहे.
त्यामुळे या स्मारकासाठी पर्यायी जागेचा विचार करून सदर स्मारकासाठी सध्याच्या जागेच्या समोर सेक्टर क्रमांक पाच मधील उंच टेकडी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर भरपूर जागा उपलब्ध असून हि जागा चारही बाजूने मोकळी असून उंचावर असल्याने या ठिकाणी स्मारक उभे केल्यास चारही बाजूंनी नागरिकांच्या दृष्टीस पडेल. तसेच याठिकाणी सोयी सुविधा देण्याच्या दृष्टीकोनातून मोठी जागा उपलब्ध आहे.
तरी संभाजी ब्रिगेडच्या मागणीचा विचार करून सध्याच्या जागेच्या समोर सेक्टर क्रमांक पाच मधील उंच टेकडी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभे करण्याची मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. सदर निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे कार्याध्यक्ष गणेश दहिभाते यांच्या सह्या आहेत.