पिंपरी (Pclive7.com):- गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण आज (दि.०५) १०० टक्के भरले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी रात्रीपासून रिमझिम पाऊस कोसळत आहे. गेल्या २४ तासांमध्ये पवना धरणक्षेत्रात २९ मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात ०.८६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर्षी १ जूनपासून या क्षेत्रात एकूण २२१५ मिमी पाऊस बरसला आहे. गेल्यावर्षीही आजच्या दिवशी म्हणजेच ५ सप्टेंबरपर्यंत पवना धरण काठोकाठ भरले होते.
राज्यात येत्या ४ दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात येत्या ४ दिवसांत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात ६ आणि ७ सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.