पिंपरी (Pclive7.com):- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे सेवा समर्पण सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा समर्पण सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. या अंतर्गत पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याणकारी योजनाअंतर्गत धान्य वाटप करण्यात आले. तसेच, पथारी व्यावसायिक, हातावरचे पोट असणारे कामगार, महिला कर्मचारी यांना छत्री आणि पिशव्या वाटप देखील करण्यात आले.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड.नितीन लांडगे, नगरसेवक राजेंद्र लांडगे, मुख्य प्रवक्ते अमोल थोरात तसेच भाजपाचे सरचिटणीस राजू दुर्गे, विजय फुगे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार लांडगे म्हणाले की, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार, १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२१ या काळात ‘‘सेवा व समर्पण अभियान’’ राबवण्यात येत आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’ आयोजित केला आहे.
त्यामाध्यमातून समाजामध्ये सेवा कार्याचे महत्त्व व राष्ट्राप्रति समर्पण भावना जागृत करण्याचा आमचा हेतू आहे. शहरातील गरीब वस्ती, अनाथाश्रम, रुग्णालये, वद्धाश्रम याठिकाणी मदत करण्यासह प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लाभार्थींना मोफत रेशन बॅग वाटप करण्यात येत आहेत.