पिंपरी (Pclive7.com):- लढाऊ युद्धनौका INS विक्रांतच्या डागडुजीसाठी किरीट सोमय्या यांनी अभियान सुरू केले होते. या अभियानातून जमा केलेले कोट्यावधी रुपये राज्यपाल यांना देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ते पैसे राज्यापालांना न देता आर्थिक सहाय्यता अपहार सोमय्या यांनी केला असल्याचा आरोप करत किरीट सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार पिंपरी चिंचवडमधील शिवसैनिकांनी केली आहे. पिंपरी पोलिसांत शिवसैनिकांनी माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या नेतृत्वात याबाबत निवेदन दिले आहे.

यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरसंघटिका अँड ऊर्मिलाताई काळभोर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, उपशहरप्रमुख अमोल निकम, पिंपरी समन्वयक गणेश आहेर, माधव मुळे, विभागप्रमुख सय्यद पटेल, विभाग संघटक खंडू शिरसाट, गजानन धावडे आदी उपस्थित होते.
पिंपरी पोलिसांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेने १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. मात्र तिची वयोमर्यादा संपल्यामुळे ती भंगारात जमा होणार होती. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी उभारण्याकामी काही वर्षांपूर्वी मोहीम राबवली होती. आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी ‘सेव्ह विक्रांत’ चळवळ उभी केली. त्यावेळी २०० कोटी रूपये राजभवनात जमा करू, असं सोमय्या यांनी सांगितले होते.
दरम्यान २०१३ – २०१४ मध्ये विक्रांत नौकेसाठी त्यांनी मुंबई मधील विविध स्थानकाच्या बाहेर उभे राहून सर्वसामान्य नागरिक, नेव्ही ऑफिसर, कर्मचारी यांच्याकडून लोकवर्गणीच्या माध्यमातून शेकडो कोटींच्या घरात निधी जमा केला होता. परंतु, आयएनएस विक्रांत (INS Vikrant) वाचवण्यासाठी जमा केलेला निधी राज्यपाल कार्यालयात पोहचलाच नाही, असा धक्कादायक खुलासा राज्यपाल कार्यालयाकडून माहितीच्या अधिकारात उघड झाला आहे. यात असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
आयएनएस विक्रांतचे पैसे सोमय्यांनी त्यांच्या मुलाच्या कंपनीत आणि निवडणूकीसाठी वापरले, असा आरोपही त्यांच्यावर होत आहे. ‘सोमय्यांनी देशद्रोह केला आहे, त्यांनी १०० कोटींच्यावर घोटाळा केला आहे. हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांच्याकडून पै-पै चा हिशोब घ्यावा. राष्ट्राप्रती त्यांची गद्दारी खपवून घेतली जाणार नाही. आपण तत्काळ किरीट सोमय्या यांची उचलबांगडी करून त्यांची चौकशी करावी. याकामी मदत करणाऱ्या दोषी व्यक्तींवर देखील कठोर कारवाई करावी. राष्ट्राची संपत्ती हडप करून त्यावर आपली पोळी भाजणाऱ्या किरीट सोमय्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, त्यासाठी तपास यंत्रणांना कामास लावावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
























Join Our Whatsapp Group