पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील बदलल्या राजकीय समीकरणांचा परिणाम पिंपरी-चिंचवडमध्येही दिसत आहे. भाजपातील प्रचंड नाराज असलेल्या माजी नगरसेवकांनी आता पक्षप्रवेशाबाबत ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाला फायदा होणार, असे चित्र निर्माण झाले आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2020/08/IMG-20220704-WA0001-240x300.jpg)
२०१७ मध्ये महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आल्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप आणि शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत भाजपातील सुमारे २५ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी जवळीक केल्याचे बोलले जात होते. त्यापैकी माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी थेट प्रवेश करुन भाजपातील अंतर्गत बंडाळीला वाट मोकळी करुन दिली होती. विशेष म्हणजे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावून भाजपाच्या स्थानिक नेत्यांविरोधात दंड थोपाटण्याची भूमिका माजी नगरसेवक रवि लांडगे, संजय नेवाळे, प्रियांका बारसे आदींनी घेतली होती.
चिंचवड विधानसभा मतदार संघातील माजी नगरसेवक तुषार कामठे, पिंपरी मतदार संघातील माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी स्थानिक नेतृत्त्वाला आव्हान बंडखोरीचे संकेत दिले होते. तसे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे, आशा शेडगे यासुद्धा स्थानिक नेतृत्त्वावर प्रचंड नाराज असल्याचे सांगितले जाते. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले, तसे बंडखोरांनी ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घेतली. अन्यथा भाजपातील सुमारे २५ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारी होते अशी चर्चा होती. मात्र, भाजपाच्या प्रतिकूल परिस्थितीत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या माजी नगरसेवकांना भाजपा आता सत्तेसाठी ‘रेड कार्पेट’देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2020/08/IMG-20220615-WA0031-300x287.jpg)
याउलट, राष्ट्रवादीसह शिवसेनेतील काही माजी नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असून, आगामी काळात पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप घडवून आणाणार आहोत. तसेच, आगामी निवडणुकीत भाजपा १०० हून अधिक जागा जिंकणार आहे, असा दावा भाजपाचे शहर संघटक अमोल थोरात यांनी केला आहे.
अजित गव्हाणेंसमोर मोठे आव्हान…
मावळत्या महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख सत्ताधारी पक्ष असल्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा वारु अत्यंत वेगाने निघाला होता. भाजपातील नाराजांची मोट बांधून भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये आव्हान उभा करण्यात येत होते. प्रभाग रचना आणि मतदार याद्यांमध्येही राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला. मात्र, आता सत्तापालट झाले. भाजपा सत्ताधारी पक्ष बनला. त्यामुळे नाराजांनी साधव भूमिका घेतल्याचे बोलले जाते. आगामी निवडणुकीत भाजपामधील जागा निश्चित करुन सुरक्षितपणे महापालिका सभागृहात पोहोचण्याचा अनेकांचा मानस निर्माण झाला. त्यामुळे नाराजांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राष्ट्रवादीला विजय खेचून आणण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या अजित गव्हाणे यांच्यासमोर मोठे आव्हान राहणार आहे.
प्रभाग रचनेत बदलाची शक्यता…
पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासक राजवट चालू आहे. महाविकास आघाडीतील सत्तेचा फायदा घेत राष्ट्रवादी, शिवसेनेला फायदेशीर प्रभाग रचना आणि मतदार याद्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप भाजपाकडून होतो. नव्या सरकारमध्ये भाजपाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्यामुळे सध्या असलेली ३ सदस्यीय प्रभाग रचना बदलून भाजपाच्या हिताची ४ सदस्यीय प्रभाग रचना करण्याबाबत भाजपाचे स्थानिक नेते आग्रही आहेत. यासाठी ‘ओबीसी आरक्षण’चा मुद्दा पुढे करण्यात येत आहे. नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर पहिलीच बैठक ‘ओबीसी आरक्षण’ संदर्भात घेतली. त्यामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणूक ३ सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार की, ४ सदस्यीय पद्धतीने होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.