सातारा – साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जल मंदिरातील भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. ऐतिहासिक परंपरा असलेला हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो सातारकरांनी गर्दी केली होती.
भवानी तलवारीचे पूजन झाल्यावर फुलांनी सजवलेल्या लाकडी पालखीत भवानी तलवारीची मिरवणूक शहरातून काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीच्या अग्रभागी सनई-चौघडा, शिंग-तुताऱ्यांचा समूह, राजघराण्यातील मानकरी, नऊवारी साडी नेसलेल्या मुली, तसेच फेटेधारी अनेक तरुण होते. राजपथावरून निघालेली मिरवणूक पोवईनाक्यावर आल्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. या तलवारीचे उदयनराजे भोसले व वीरप्रतापसिंह राजे भोसले यांनी शास्त्रोक्त पूजन केले. यावेळी वेदमूर्ती शास्त्रींनी पौरोहित्य केले.