पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेत आता सीबीएसई बोर्ड, आसीएसई बोर्डच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. महापालिका प्रशासनाने नुकताच या योजनेत बदल केला असून अखेर शत्रुघ्न काटे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
याबाबत माहिती देताना माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत १० वी आणि १२ वीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना (१० वी ८० – ९०% आणि ९०% पेक्षा जास्त आणि १२ वी ९० % वर) बक्षीस योजना जाहीर केली होती.मात्र या बक्षीस योजनेत फक्त महाराष्ट्र राज्य मंडळामधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच याचा लाभ होणार होता. सीबीएसई बोर्ड तसेच आसीएसई बोर्ड अंतर्गत येणाऱ्या शाळां, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या या शिष्यवृत्ती योजनेतून वगळण्यात आले होते.
हि बाब अत्यंत चुकीची असून सीबीएसई बोर्ड तसेच आसीएसई बोर्ड मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक होती. म्हणूनच शत्रुघ्न काटे यांनी तात्कालीन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना तसेच सध्याचे आयुक्त शेखर सिंह यांना लेखी निवेदन देऊन याबाबत मागणी केली होती.
अखेर महापालिका प्रशासनाने शत्रुघ्न काटे यांच्या मागणी नुसार योजनेमध्ये सुधारीत बदल केला आहे. त्यानुसार सीबीएसई बोर्ड तसेच आसीएसई बोर्ड अंतर्गत येणाऱ्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ आता देण्यात येणार आहे. या योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरणे व स्विकृती मुदत ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती शत्रुघ्न काटे यांनी दिली आहे.