पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी बंडखोरी करण्याची तयारी दर्शवली आहे. कलाटे हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी राहुल कलाटे यांच्या वाकड येथील कार्यालयास भेट देऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीत भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यानंतर महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कालच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चिंचवडचा उमेदवार हा घड्याळ चिन्ह घेऊनच निवडणूक लढवेल असे जाहीर केले होते. त्यामुळे चिंचवडची उमेदवारी राहुल कलाटे की नाना काटे यांना मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
दरम्यान आज सकाळीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर राहुल कलाटे यांनी देखील बंडाचा झेंडा आपल्या हातात घेतला असून अपक्षच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून काही वेळातच ते त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी राहुल कलाटे यांच्या वाकड येथील कार्यालयात जाऊन त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी साकडे घातले आहे. आता सुनील शेळके यांची मनधरणी कितपत यशस्वी होती हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.