पिंपरी (Pclive7.com):- कार्तिकी एकादशीनिमित्त आज लाखो भाविक आळंदीत दाखल झाले होते. टाळ-मृदुगांच्या गजराने अलंकापुरी दुमदुमून गेली होती. यावेळी वारकऱ्यांनी कर्जातून मुक्ती करण्यासाठी सरकारला सुबुद्धी देण्यासह इतर संकटं दूर करण्याचे साकडं माऊली चरणी घातले.
आज संपूर्ण आळंदीत श्री जगदगुरू ज्ञानोबारायांचा जयजयकार सुरु होता. कार्तिकी दिवशी हा सोहळा भक्तांसाठी महत्वाचा असतो. पवित्र इंद्रायणीच्या काठी आणि मंदिराच्या वीणा मंडपात महिला वारकरी फेर, फुगड्या व भारुडे सादर करण्यात मग्न होत्या. तर देहभान विसरून वारकरी हरिनामाचा गजर करत सोहळ्याचा अनुभव घेत होते. आळंदी लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२२ व्या संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक आळंदीत दाखल झाले होते. पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून भाविकांनी माऊलीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांनी आळंदीत ग्रंथ, गळ्यातील तुळशीची माळ खरेदी करण्यावर भर दिला होता. राहुट्यांमध्ये भाविकांनी हरिनामाचा अखंड गजर सुरु ठेवला होता.
























Join Our Whatsapp Group