पिंपरी (Pclive7.com):- १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या पुणे वनाज ते पिंपरी मेट्रो उद्घाटन कार्यक्रमावर मनसे वतीने बहिष्कार टाकण्यात आला आहे. वनाज ते पिंपरी मेट्रो धावणार पण पिंपरी चिंचवडला त्याचा फायदा काय असा सवालही मनसे वतीने विचारण्यात आला आहे. तसेच पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम लवकर सुरु करण्याची मागणी मनसे वतीने करण्यात आली. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यावतीने महा मेट्रोचे अध्यक्ष श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आले की, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांच्या मागणी नुसार गेले अनेक दिवसापासुन पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम पुर्ण करण्यात यावे अशी मागणी मनसेच्यावतीने सातत्याने करण्यात येत आहे. या विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने वेळो वेळी आंदोलन करण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील कामगार वर्ग, महिला वर्ग, विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात पुणे शहरात विविध कामासाठी, शिक्षणासाठी दररोज जातो. परंतु हा मेट्रोमार्ग अर्धवट अवस्थेमध्ये असल्यामुळे शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. तरी पिंपरी ते निगडी काम लवकरात लवकर सुरू करून शहरातील नागरीकांना दिलासा द्यावा.
आम्ही ५ जानेवारी २०२३ रोजी दिलेल्या पत्राला महामेट्रोकडून उत्तर देण्यात आले होते की, महामेट्रोने पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रोमार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) राज्य शासनाला सादर केला असून, राज्य शासनाने सदरी अहवाल गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA/GOI) कडे मान्यतेसाठी पाठवला आहे. या पत्रानुसार सद्यस्थितीत सदरील प्रस्ताव केंद्रशासनाच्या विचाराधीन आहे असे पत्रात नमूद केले आहे. तरी आपण पुढील प्रक्रियेचा आवश्यक तो पाठपुरावा करून आम्हाला लवकरात लवकर खालील गोष्टींचा तपशील द्यावा.
१) पिंपरी ते निगडी विस्तारित मेट्रोमार्गिका कधीपर्यंत सुरु होणार?
२) सदर प्रकल्प एवढ्या दिवसापासून प्रलंबित असण्याचे कारण.
३) सदर प्रकल्पासंदर्भात आपण वेळोवेळी राज्य शासन तसेच केंद्र शासन यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याचे तपशील.
४) थोड्याच काळापूर्वी राज्य शासनाचे तसेच केंद्र शासनाचे आर्थिक अंदाजपत्रक जाहीर झालेले असून त्यामध्ये महामेट्रो साठी जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीबद्दल तपशील तसेच त्यातील पिंपरी ते निगडी मेट्रोमार्गिकेसाठी केलेली आर्थिक तरतूद. अशा मागणीचे निवेदन सचिन चिखले यांनी श्रावण हर्डीकर यांना दिले. त्यावर मेट्रोचे निगडी ते पिंपरी लवकरच काम चालु करु असे आश्वासन महा मेट्रोचे अध्यक्ष श्रावण हर्डीकर यांनी दिले.
यावेळी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, सचिव रूपेश पटेकर, विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, माथाडी अध्यक्ष सचिन शिगाडे, किरण गवळी उपस्थित होते.