पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीत संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात, हजारो कृष्ण भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. तपोवन मंदिर रस्ता व १८ मीटर रस्त्यावर जणू गर्दीचा महापूरच आला होता. तरुणाईचा सळसळता उत्साह, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, ताल धरायला लावणारा ठेका, सेलिब्रिटी अन् गोविंदाच्या गजरात दहीहंडी सोहळा रंगला होता.

सालाबादप्रमाणे संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने दहीहंडी उत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री निकिता दत्ता, तन्वी मुंडले, संस्कृती बालगुडे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
मुंबई चेंबुर येथील सद्गुरू साईनाथ गोविंदा पथक यांनी पुरुष दहीहंडी तर दोस्ती महिला गोविंदा पथक, चुनाभट्टी मुंबई यांनी महिला हंडी फोडण्याचा मान पटकावला. दहीहंडी निमित्त ११,११,१११/- रुपयांच्या बक्षिसाचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित जनसमुदायाने मनोगत व्यक्त करताना संदीप वाघेरे म्हणाले की, “जनसेवा हीच ईश्वर सेवा” मानून काम करण्याचा माझा मानस आहे. मी नगरसेवक म्हणून काम करत असताना माझ्या पिंपरीगाव प्रभागाचा विकास करतानाच संकोचीत विचार न करता संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठीही वेळोवेळी पत्रांद्वारे आयुक्तांकडे व सक्षम अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करताना महापालिका सर्वसाधारण सभेतही माझी भूमिका मांडली. पिंपरी चिंचवडच्या जीवनदायीनी असलेल्या पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांचे प्रदूषण कमी करून नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याबाबतच्या प्रकल्पाचा वेळोवेळी पाठपुरावा केला. या प्रकल्पाला निधी उभा करण्यासाठी BOND (रोखे) उभा करण्याची सूचना केली. आज त्याला मूर्तरूप येवू लागले आहे. त्याचबरोबर नदी काठच्या भागाचा व भूमीपूत्रांचा विकास व्हावा म्हणून त्याला टिपी स्कीमची योजना राबवावी ही महत्वाची सूचना आयुक्तांना केली होती.
पुढे ते म्हणाले की, येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवड शहराला औद्योगिक नागरी असल्यामुळे स्वत:ची विकसित होण्याची क्षमता आहे. हे शहर झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात देशात तिसरे व राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. नियोजन केल्यास या शहरातून अनेक प्रगतीच्या वाटा निर्माण होतील. शहरातील उद्योगांना योग्य चालना देऊन बेरोजगारी कमी करण्याचा माझा मानस आहे. शहर परिसरात व मावळात अनेक अध्यात्मिक मंदिरे, ऐतिहासिक गडकोट किल्ले आदि ठिकाणे आहेत. या परिसराचा सुनियोजीत विकास केल्यास दुबई, सिंगापूर सारखे पर्यटन क्षेत्र येथे वाढीस लागू शकते. मोशी, डूडूळगाव येथे दुबईतील फरारी, युनिवर्सल डीझणी वल्र्ड सफारी पार्क सारखे सुमारे ४०० ते ५०० एकरात सफाटी पार्क उभे करणाची सूचना आयुक्तांना केली असून त्यांनी त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. टाटा समूहाकडील धरणांचा करारनामा २०३० मध्ये संपुष्टात येत आहे. या उद्योगनगरीला भविष्यात लागणाऱ्या पिण्याच्या व औद्योगिक पाण्यासाठी मुळशी व अन्य धरणातील १७ टिएमसी पाणी सावित्री नदीद्वारे समुद्रात जाऊन वाया जात आहे. ते पाणी आपल्या शहराकडे वळविता येवू शकते. पुणे ते लोणावळा चार पदरी रेल्वे विकसीत करतानाच मेट्रो निगडी ते लोणावळाही विकसीत करण्यासाठी प्रयत्न करणार असलेचे मत संदीप वाघेरे यांनी नागरिकांशी संवाद साधताना व्यक्त केले.
या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, समीर मासुळकर, चंद्रकांत नखाते, निलेश बारणे, सिद्धेश्वर बारणे, मीनाताई नाणेकर, डॉ.अरुण दगडे, डॉ.विनायक पाटील, संदीप कापसे, वस्ताद दत्तोबा नाणेकर, रामभाऊ कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर आहिरराव व सायमा शेख यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन युवा मंचचे अध्यक्ष हरिष वाघेरे, कुणाल सातव, उमेश खंदारे, नितीन गव्हाणे, अमित कुदळे, सचिन वाघेरे, हनुमंत वाघेरे, रंजनाताई जाधव यांनी केले.
























Join Our Whatsapp Group