मंदिर परिसराचे अत्याधुनिक सुविधांनी सुशोभिकरण; भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील ऐतिहासिक महत्त्व असलेले चऱ्होली बुद्रुक येथील श्री वाघेश्वर मंदिर आणि परिसराचे अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुशोभिकरण करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठी यात्रा वर्षानुवर्षे भरते. येथील बैलगाडा घाटही प्रसिद्ध आहे. त्यामुळे ‘परंपरा आणि संस्कृतीचे जतन’ करण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. भाजपा आमदार महेश लांडगे आणि माजी महापौर नितीन काळजे यांनी याबाबत पुढाकार घेतला असून, महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून लवकरच कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.

महापालिका प्रभाग क्रमांक ३ चऱ्होली येथील श्री वाघेश्वर मंदिराच्या सभोवताचा परिसर सुशोभिकरण करणे. या कामामध्ये येथील परंपरागत बैलगाडा शर्यत घाट, कुस्ती आखाडा याचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे. या भागात आलेले भाविक किंवा नागरिकांसाठी मंदिर परिसरातील टेकडीचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ११ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. आगामी महाशिवरात्रीच्या यात्रेपूर्वी सुशोभिकरण आणि घाटाचे काम पूर्ण व्हावे, असे नियोजन करण्यात आले आहे.
सुशोभिकरणासाठी ‘उत्सव थीम’…
श्री. वाघेश्वर मंदिर आणि टेकडी परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी ‘उत्सव थीम’चा निश्चित करण्यात आली आहे. हा उत्सव… संस्कृतीचा आणि पारंपरिक क्रीडा प्रकारांचा असेल. त्याद्वारे कुस्ती आखाडा, बैलगाडा घाट, टेकडीच्या उतारावर जलसंधारण, भव्य प्रवेशद्वार, भक्ती आणि शक्तीचे प्रतिक असलेली प्रभू श्रीराम भक्त हनुमान यांच्या गदेची प्रतिकृती, कुस्तीपटूंचे शिल्प, बैलगाडा शिल्प असे आकर्षन असणार आहे.
चऱ्होलीतील श्री वाघेश्वर महाराज मंदिर हा आपल्या अस्मितेचा आणि श्रद्धेचे स्थान आहे. पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक येत असतात. समाविष्ट गावांच्या विकासाचा ‘बॅकलॉग’ भरुन काढण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. ‘मोशी-चिखली-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित होत आहे. नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा, अशी ठिकाणे विकसित करणे काळाची गरज आहे. त्यामुळे भौगोलिक वैभवसंपन्न चऱ्होली आणि वाघेश्वर मंदिर परिसरात ‘आपली परंपरा आणि संस्कृती’चे जतन होणार असून, या परिसराचे भव्य सुशोभिकरण करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.























Join Our Whatsapp Group