पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली पवना नदी गुरूवारी (दि.०२) पुन्हा फेसाळली आहे. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार यांनी नदी सुधार प्रकल्प हाती घेतले आहेत. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड महापालिकेचे ढिम्म प्रशासन नदी सुधार बाबत कुठलीही कार्यवाही करत नसल्याने पवनामाईची पुरती वाट लागली आहे. नदी पात्रात केमिकल युक्त पाणी मिश्रित झाल्यामुळे आज सकाळपासूनच थेरगाव येथील केजुदेवी बंधाऱ्यातील पाणी मोठ्या प्रमाणात फेसाळलेले पाहायला मिळत आहे.

थेरगाव येथील केजुदेवी बंधारा ते चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी घाट या दरम्यान पवना नदी मोठ्या प्रमाणात फेसाळली. शहरातील ड्रेनेजचे पाणी कुठलीही प्रक्रिया केल्याशिवाय थेट नदीत सोडले जाते. तसेच रसायन मिश्रित पाणी देखील नदीत मिसळले जाते. यामुळे पवना नदीची दुरवस्था झाली आहे. जलपर्णी वाढणे, पाण्यावर फेस येणे, हे प्रकार सातत्याने सुरु आहेत. नदीचे आरोग्य बिघडल्याने त्याचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर देखील होणार आहे.
नदीत थेट ड्रेनेजचे आणि केमिकल मिश्रित पाणी सोडले जाऊ नये याबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. नदी प्रदूषित होण्याच्या कारणांच्या तळाशी जाऊन यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र महापालिका प्रशासन असे करताना दिसत नाही. पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.
पवना नदी प्रदूषित झाल्याने नदीतील मासे आणि इतर जलचर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. त्यामुळे याबाबत महापालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई, अशी मागणीही पर्यावरण प्रेमी करत आहेत.
























Join Our Whatsapp Group