आळंदी (Pclive7.com):- पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एका हॉटेलमध्ये पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार अविनाश धनवे याची पिस्तूलातून गोळ्या झाडून तसेच कोयत्याने सपासप वार करून तीन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपी फरार आहेत.
यातील एका आरोपीला पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट तीनने पकडलं असून इंदापूर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. राहुल संदीप चव्हाण असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तो आळंदीत मैत्रिणीला भेटायला आला होता. तेव्हा त्याला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तीन दिवसांपूर्वी इंदापूर येथील हॉटेल जगदंबमध्ये मित्रांसह गप्पा मारत बसलेल्या अविनाश धनवे याची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. सहा ते सात जणांनी अचानक हल्ला केला आणि धनवेला ठार मारले. कोयत्याने सपासप आठ ते दहा वार करणाऱ्या आरोपीला पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट तीनने पकडले आहे.
राहुल संदीप चव्हाण हा आळंदीत त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी येणार होता. याची खबर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली. आरोपी राहुलची वैद्यकीय तपासणी करून त्याला इंदापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.























Join Our Whatsapp Group