पिंपरी (Pclive7.com):- दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने आज रविवारी (२४ मार्च) सायंकाळी ५.३० वाजता ‘मावळ लोकसभेचा रणसंग्राम’ या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे.
मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे, पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, भाजपचे पिंपरी शहराध्यक्ष शंकर जगताप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर हे या चर्चेत सहभागी होणार आहेत. लेटस अप मराठीचे संपादक योगेश कुटे कार्यक्रमाचे सूत्रसंवादक असणार आहेत.
या चर्चेदरम्यान मावळ मतदारसंघातील विविध प्रश्न तथा समस्यांवर आधारित सविस्तर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांना विनामूल्य प्रवेश असून काही जागा राखीव असणार आहेत.