पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समिती भ्रष्टाचाराच्या आरोपाने वर्षभर चांगलीच चर्चेत राहिली आहे. या स्थायीची शेवटची सभा बुधवारी दि.२८ रोजी होणार आहे. या सभेच्या अजेंड्यावर सुमारे ५५० कोटी रुपयांचे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आलेत. यात प्रामुख्याने वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना, रस्ते विकसित करणे, रस्ते डांबरीकरण असे विषय आहेत. त्यामुळे कोटी-कोटी उड्डाणे घेणारी ही स्थायी समिती शेवटची सभा ‘रेकॉर्डब्रेक’ होणार असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार करत गेल्यावर्षी भाजप पहिल्यांदाच महापालिकेत सत्तेत आली. सीमा सावळे यांना पहिला स्थायीच्या सभापती होण्याचा बहुमान मिळाला. वर्षभराच्या कार्यकाळात अनेक महत्वपूर्ण निर्णय त्यांनी स्थायीच्या माध्यमातून घेतले. मात्र विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे वारंवार त्यांच्यावर आरोप झाले. नुकताच त्यांनी समाविष्ट गावांच्या विकासासाठी मंजूर केलेला ४२५ कोटींचा विषय तर चांगलाच गाजला होता. विरोधकांनी यावरून आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. यात स्वपक्षिय भाजप खासदार अमर साबळे यांनीही स्थायीच्या कारभारावर ताशेरे ओढत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला म्हणावे असे महत्व दिलं नाही. त्यामुळेच भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या स्थायीला एकप्रकारे ‘क्लिनचिट’ मिळाली आहे.
आरोपांच्या कचाट्यात सापडलेल्या स्थायीची आता शेवटची सभा राहिली आहे. आठ सदस्य चिठ्ठीद्वारे बाहेर पडले आहेत. या सदस्यांचा कार्यकाळ शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. दरम्यान या शेवटच्या सभेत तब्बल ५५० कोटी रूपयांच्या विकास कामांचे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आलेत. मोशीत ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प राबविणार आहे. त्यासाठी २०८.३६ कोटी रुपये खर्च येणार आहे. महापालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत च-होली येथे १ हजार ४४२ सदनिका बांधण्यात येणार आहेत. याचे काम मन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लि. कंपनीला देण्यात येणार असून त्यांना १३२ कोटी ५० लाख रुपये देण्यात येणार आहेत. रावेत येथे ९३४ सदनिका बांधण्यात येणार आहेत. हे काम मन. इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लि. कंपनीला देण्यात येणार असून त्यांना ८८ कोटी २५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्याचे काम एस.अॅण्ड जे विल्डकॉन प्रा. लि यांना देण्यात येणार असून त्यासाठी त्यांना १८ कोटी ४१ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
दापोडी पूल ते तुळजाभवानी मंदिर ते सृष्टी चौकापर्यंतच्या १८ मीटर रुंद रस्त्याचे अद्यावत पद्धतीने नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी १८ कोटी २६ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. अग्निशामक विभागाकरिता तीन फायर कॅनन टॉवर व्हेईकल वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी आठ कोटी १४ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. नाशिक फाटा ते वाकड या बीआरटीएस रस्त्यावर गोविंद गार्डन चौक येथे सबवे बांधण्यात येणार असून त्यासाठी ९ कोटी २९ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. वायसीएम रुग्णालय येथे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नवजात अर्भक विभागाचे नूतनीकरण, डॉक्टरांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी ५ कोटी ४७ लाख रुपयांचा खर्च येणार आहे.
‘ह’ प्रभागात ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार डांबीरकरण करण्यासाठी ३ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. क’ प्रभागात ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार डांबीरकरण करण्यासाठी ३ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. पिंपळेगुरव येथील विनायकनगर, कवडेनगर व इतर भागात पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी ८ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. सांगवी येथील रस्त्याची विशेष दुरुस्तीची कामे करण्यात येणार असून त्यासाठी ३ कोटी ५७ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. पिंपळेगुरव येथील रस्त्याच्या कडेने पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी आणि अद्यावत पद्धतीने रस्ता विकसित करण्यासाठी ४ कोटी ४ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. पिंपळेगुरव मधील बँक ऑफ महाराष्ट्र ते ओरीयाना इमारतीपर्यंतचा रस्ता अद्यावत पद्धतीने विकसित करण्यात येणार असून त्यासाठी ७ कोटी ७३ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. पिंपळेगुरव मधील काटेपूरम चौक ते मनपा शाळापर्यंतचा रस्ता अद्यावत पद्धतीने विकसित करण्यासाठी ८ कोटी ७१ लाख रुपयांचा खर्च येणार आहे.
पिंपरीत कल्याणकारी केंद्र बांधण्यात येणार असून त्यासाठी ७ कोटी ५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील भीमसृष्टीतील म्युरल्स करिता विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी २ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आकुर्डीतील विठ्ठलमंदिर परिसरात पालखी शिल्प उभारण्यात आणि सुशोभिकरण करण्यात येणार असून त्यासाठी एक कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. भोसरी, गवळीनगरमधील आरक्षण क्रमांक ४०७ येथे खेळाचे मैदान येथे क्रीडासंकुल इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. हे प्रस्ताव बुधवारी दि.२८ होणा-या स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवले आहेत.






















Join Our Whatsapp Group