पिंपरी (Pclive7.com):- रोजगार मेळाव्यातून युवकांना रोजगाराचे विविध पर्याय उपलब्ध होत आहेत. युवकांनी किमान ५ वर्ष नोकरी करून अनुभव मिळवावा व त्यानंतर उद्योजकतेकडे वळावे. अशा या मेळाव्याच्या माध्यमातून पिंपरी महापालिका तरूणांना रोजगार देण्यासाठी कटिबध्द अाहे असे मत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाकडील दिनदयाळ उपाध्याय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. आज सकाळी ऑटो क्लस्टर,चिंचवड येथे झालेल्या या कार्यक्रमास सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विकास मार्गदर्शन केंद्राचे सह संचालिका अनुपमा पवार, नगरसदस्य नामदेव ढाके, बाबु नायर, नगरसदस्या ममता गायकवाड, प्रियंका बारसे, अनुराधा गोरखे, अश्विनी बोबडे, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, नगरसचिव उल्हास जगताप, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, सहाय्यक समाज विकास अधिकारी सुहास बहादरपुरे आदी उपस्थित होते.
सत्तारूढ पक्षेनेते एकनाथ पवार म्हणाले, पूर्वी वर्तमानपत्र हे एकमेव नोकरी विषयक माहिती मिळण्याचे माध्यम होते. आजच्या काळात विविध माध्यमातून नोकरीविषयी माहिती उपलब्ध होते. त्याचा सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी फायदा करून घ्यावा. नोकरी करता करता युवकांनी उद्योग सुरु करण्याबाबत देखील विचार करावा असेही ते म्हणाले.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, चांगले शिक्षण असून देखील आजच्या युवकांना मनासारखी नोकरी मिळत नाही. कौशल्य प्रशिक्षण हेच चांगली नोकरी मिळण्याचे सोपे व सुलभ साधन आहे. व्यक्तिमत्व विकास व कौशल्य याचे मुल्यमापन झालेवरच नोकरी मिळते. शिपाई पदांसाठी पदवीधर, पीएचडी धारक युवक अर्ज करताना दिसत आहेत. अनुभवाची कमतरता असल्यामुळे योग्य नोकरी मिळत नाही. सुरुवातीला कमी पगाराची नोकरी स्विकारून ३-४ वर्षाचा अनुभव मिळवावा. व त्यानंतर चांगल्या पगाराची नोकरीची अपेक्षा करावी. तसेच अनुभव मिळवून भविष्यात फूड, हेल्थ, हॉस्पिटॅलिटी, आर्ट अॅंड क्राफ्ट आदी क्षेत्रामध्ये उद्योगाच्या संधी शोधाव्यात. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विकास मार्गदर्शन केंद्राच्या सह संचालिका अनुपमा पवार म्हणाल्या, सन २००७-०८ पासून सरकारच्या वतीने अशाप्रकारच्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना एकाच छताखाली विविध कंपन्यांच्या मुलाखती देता येतात. नोकरी शोधताना युवकांनी वैयक्तिक अडचणी दूर ठेवाव्यात. केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध वेब साईट वर रोजगार संबंधित माहिती उपलब्ध असून त्याचा युवकांनी फायदा घ्यावा.
यावेळी अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले. सुत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. या रोजगार मेळाव्यामध्ये पुणे जिल्हयातील ८० विविध कंपन्यामधील सुमारे ८५०० रिक्त पदांसाठी हजारो उमेदवारांनी रोजगार मिळणेकामी उपलब्ध कंपनीच्या मनुष्यबळ विकास प्रतिनिधींकडे नोकरी मिळणे कामीचे अर्ज दाखल केले व मुलाखती दिल्या.