पिंपरी (Pclive7.com):- पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहरामध्ये गॅस एजन्सी कडून नागरिकांना दिला जाणार्या गॅसचे वजन करुन देणे हे कायद्याने बंधनकारक असताना तो गॅस नागरीकांना वजन करुन दिला जात नाही. गॅस एजन्सीचा गॅसचा जो कायद्याने दर आहे त्यापेक्षा अधिक दर ग्राहकांकडून घेतला जातो. तसेच गॅस एजन्सीकडे जे परप्रांतीय कर्मचारी आहेत त्यांचे पोलीस व्हेरीफिकेशन झालेला नाही. ५ एप्रिलपर्यंत पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये काळा बाजार बंद न केल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा छावा संघटनेचे प्रमुख धंनजय जाधव यांनी उप जिल्हाधिकारी राजेंद्र मेटे यांना निवेदनाव्दारे दिला आहे.
यावेळी पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमोल वीर, छावा महाराष्ट्र सल्लागार मच्छिंद्र चिचोंले, पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष नानासाहेब बालघरे, किरण रजपुत, समीर वीर, गणेश गवळी, संदिप डाके, आकाश लांडगे, अमित भोसले, मोहन सगर, बोरकर, हनुमंत थोरात उपस्थित होते.
छावा संघटनेचे प्रमुख धंनजय जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे की, पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये काळा बाजार सुरू आहे. गॅस एजन्सीचे कर्मचारी गॅस सिलिंडर मधुन दिड ते दोन किलो गॅस काढुन इतर सिलिंडरमध्ये अनाधिकृत भरुन विकतात. गॅस एजन्सी कडून काळ्या बाजारात या गॅसची विक्री केली जाते. या गॅसचा वापर घरगुती ग्राहकांना असताना त्याचा वापर शेगडी रिपेअरिंगच्या नावाखाली २ किलो व ४ किलोच्या गॅस शेगडी मध्ये रिफिलींग करण्यासाठी वापरतात. हा गॅस भरते वेळी स्फोट होण्याची दाट शक्यता असते. यामध्ये मोठी जिवीतहानी व वित्त होऊ शकते. अन्न पुरवठा विभाग, पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड येथे यापूर्वी छावा संघटनेमार्फत गॅसचा जो काळा बाजार चालतो त्यांच्यावर कडक कार्यवाहीची मागणी केली आहे. तरी देखील अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. गेल्या वर्षी चिखली, मोशी, औंध, अशा अनेक ठिकाणी सिलिंडचे स्फोट झाले आहेत. तरी पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहरात गॅसचा अनाधिकृत व्यवसाय आज ही खुले आम चालत आहे. गॅस रिफीलिंग दुकानांवर प्रशासनाचा कसलाही वचक राहिला नाही. शहरात आजही गॅस सिलिंडरच्या स्फोट होण्याच्या घटना घडत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. असेच जर शहरात चालत असेल तर छावा संघटना शहरातील गॅस रिफीलींग दुकांने बंद करण्याची धडक मोहिम राबवेल. प्रशासनाने ५ एप्रिलपर्यंत पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये काळा बाजार १००% बंद न केल्यास छावा संघटनेकडुन आमरण उपोषण करण्यात येईल. आज वर छावा संघटनेने अनेक वेळा अनाधिकृत गॅस भरताना कर्मचारी पकडून दिले आहेत. जर अनाधिकृत कारभार बंद न झाल्यास मोठे जन आंदोलन उभ करणार आहे असे छावा संघटनेचे प्रमुख धंनजय जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.