पिंपरी (Pclive7.com):- जागतिकीकरणाच्या आणि औद्योगिकीकरणाच्या रेट्यात गावागावात वेश्या व्यवसाय वाढीस लागला आहे. मान्यता नसल्याने प्रसंगी उध्वस्त होण्याची वेळ वेश्यांवर येते. एक व्यवसाय म्हणून त्यास मान्यता मिळाली तर पोलीस, ग्राहक आणि मालकीण या तिघांकडून होणारे शोषण थांबेल, असे प्रतिपादन तृतीयपंथी कवियत्री दिशा शेख यांनी पिंपरी येथे व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघ व पत्रकार कै.भा.वि.कांबळे प्रतिष्ठानच्या वतीने बहुचर्चित वेश्यांच्या जीवनावरील ‘आफ्टर ४०’ या शॉर्ट फिल्मचा शो व चाळीशीनंतरच्या वेश्यांचे आयुष्य’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट, वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन केंद्र चालविणाऱ्या ज्योती पठानिया, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लांडगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण कांबळे, शॉर्टफिल्मचे लेखक व दिग्दर्शक विजय जगताप, ॲड. श्रीकांत मोरे यावेळी उपस्थित होते.
हा अनधिकृत व्यवसाय असल्याने त्याकडे पोलिसांचा व समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन खूप नरकयातना भोगणारा असून, असंख्य प्रश्नांचा गुंता व तो सोडविण्यातच त्यांची हयात जाते, अशी व्यथा दिशा शेख यांनी व्यक्त केली.
तर डॉ. अनिल अवचट यांनी माणसाला वेश्या जीवनाविषयी सेक्सवर आधारित विकृत कुतूहल असतं. मग ही गरज भागविण्यासाठी वेश्यांवरचं साहित्य निर्माण होतं. सेक्स चालवण्यासाठी वेश्यांचा वापर करणारे हेच वेश्यांचे शोषक असल्याचे त्यांनी म्हटले.
ज्योती पठाणिया यांनीही आपले अनुभव यावेळी कथन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल लांडगे तर स्वागतपर मनोगत अरुण कांबळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत चौगुले तर आभार ॲड. श्रीकांत मोरे यांनी मानले.























Join Our Whatsapp Group