पिंपरी (Pclive7.com):- पुढारी, उद्योगपतींची पसंती असलेल्या ४० लाखांच्या फॉर्च्युनर कारचा चक्क कचरागाडी म्हणून वापर केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दोन महिन्यापूर्वी घेतलेल्या कारमध्ये होणा-या तांत्रिक बिघाडामुळे वैतागलेल्या ग्राहकाने फॉर्च्युनरमध्ये कचरा टाकून संताप व्यक्त केला. तसेच, ही फॉर्च्युनर महापालिकेला कचरा वाहतुकीसाठी देण्याबाबत महापालिका आयुक्तांशी पत्रव्यवहारही केला आहे. दुसरीकडे ही कार जाळणार असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी ती जप्त केली आहे. दरम्यान, कारची दुरुस्ती सुरू असताना ग्राहकाने चिडून हा प्रकार केल्याचे शरयू टोयोटा सर्व्हिस सेंटरच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे.
भोसरीतील रहिवासी हेमराज चौधरी यांनी ४० लाख रुपये खर्च करून नवीकोरी फॉर्च्युनर कार खरेदी केली. आलिशान कारने दोनच महिन्यात दुखणे काढायला सुरुवात केली. पुढच्या बाजूला दबणे, इंजिन व्हायब्रेट होणे अशी कामे गाडी वारंवार काढू लागली. चव्हाण यांनी तात्काळ भोसरीतील शरयू टोयोटा या सर्व्हिस सेंटरला भेट दिली. तिथल्या अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार केली. पण कोणी ऐकूनच घेईना. तीन वेळा सर्व्हिस सेंटरला चकरा मारल्या, सुमारे ८ – १० वेळेस सर्व्हिस सेंटरच्या अधिकाऱ्यांना विनंत्या केल्या, पण अडचण काही केल्या दूरच होईना.
शेवटी कंटाळून आज (गुरुवारी) सकाळी चौधरी यांनी आपली आलिशान फॉर्च्युनर कार सर्व्हिस सेंटरच्या समोर उभी केली आणि गाडीत चक्क कचरा भरला. आलिशान कारला कचरागाडी बनविल्यामुळे परिसरातील नागरिकांनी या आलिशान कचरागाडीला बघायला गर्दी केली.
सर्व्हिस सेंटर मधील कामगाराने कारची चक्कर मारली. त्याला कारमध्ये अडचण आढळली. कारमध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करावा लागेल, असे त्या कर्मचाऱ्याचे म्हणणे होते. तरी देखील सर्व्हिस सेंटरमधील व्यवस्थापकाने काहीही अडचण नसल्याचे चुकीचे सांगितले. त्याचा आपण निषेध केला असल्याचे हेमराज चौधरी यांनी सांगितले. तसेच, ही कार आता महापालिकेला कचरा वाहतुकीसाठी देणार असून महापालिका आयुक्तांशी तसा पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या संदर्भात शरयू टोयोटाचे व्यवस्थापक मुक्तेश बेंद्रे म्हणाले की, चौधरी यांच्या कारमध्ये थोडासा तांत्रिक बिघाड झालेला आहे. तो दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू होती. दुरुस्तीच्या प्रक्रियेबाबत चौधरी यांनी सांगण्यात आले होते. पण त्यांनी चिडून कारमध्ये कचरा भरला. ग्राहकांना योग्य सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.





















Join Our Whatsapp Group