पुणे (Pclive7.com):- पुण्याच्या वडगाव शेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांना काल रात्री उशिरा पुण्यातील लोहगाव परिसरात धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले बंडू खांदवे यांच्याकडून ही धक्काबुक्की झाल्याचा आरोप आमदार पठारे यांच्या समर्थकांनी केला आहे. या दोघांमध्ये स्थानिक मुद्द्यांवरून शाब्दिक वाद सुरु झाला. यानंतर या शाब्दिक वादाचे रूपांतर झटापटीत झाले. ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमकं काय झालं?
लोहगाव परिसरात माजी सैनिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. आमदार बापू पठारे आणि लोहगाव ग्रामपंचायतचे माजी सभापती बंडू खांदवे यांच्यात स्थानिक रस्त्यांच्या कामांवरून शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर धक्काबुक्की, झटापटीमध्ये झाले.
बंडू खांदवे काय म्हणाले?
या घटनेबाबत बोलताना बंडू खांदवे यांनी आरोप केला की, “आमचे आंदोलन प्रशासनाविरुद्ध होते, पण आमदार पठारे यांनी तो विषय स्वतःकडे ओढावून घेत शाब्दिक वाद घातला. या झटापटीत आमदारांच्या तीन-चार सुरक्षारक्षकांनी माझा शर्ट फाडला आणि मला मारहाण केली.”
बापू पठारे काय म्हणाले?
तर दुसरीकडे, आमदार बापू पठारे यांनी खांदवे यांचा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले, “येथील रस्त्यांसाठी डिसेंबर २०२३ मध्ये ३१ कोटी रुपये मंजूर झाले होते, मग २०२४ पर्यंत ते कोणी अडवले? रस्त्यांवर पाण्याच्या आणि ड्रेनेजच्या लाईन्स नव्हत्या, नागरिकांनी त्या जोडल्या नव्हत्या. मग रस्ते करायचे कसे? राजकारण म्हणून आंदोलन करायचे का? ५ वर्षांमध्ये ते सत्तेत होते तेव्हा आर पी (DP) रस्ते का केले नाहीत, कुणी अडवले होते? खोटं राजकारण करू नका, जनता माफ करणार नाही.”
यावरुन रस्त्याच्या कामांवरून लोहगाव परिसरात अनेक दिवसांपासून स्थानिक आमदार आणि इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरु असल्याचे दिसत आहे. याच वादाचा भाग म्हणून या भागात आंदोलन देखील नियोजित करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमधील या झटापटीमुळे लोहगाव परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.