
(लेखन – बाळासाहेब जवळकर, ज्येष्ठ पत्रकार)
पिंपरी (Pclive7.com):- औद्योगिकीकरणातून उदय झालेल्या आणि उद्योगनगरी म्हणूनच नावारूपाला आलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या उभारणीत टाटा मोटर्सचे मोठे योगदान आहे. टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख असणाऱ्या रतन टाटा यांच्या दृष्टीने टाटा मोटर्सचा पुणे प्लांट कायमच महत्त्वपूर्ण राहिला. त्यांचे येथील कामगारांशी असणारे नाते एखाद्या संयुक्त कुटुंबाप्रमाणे होते. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रतन टाटांचे निधन झाले, तेव्हा संपूर्ण देश हळहळला. त्याचवेळी आपल्याच कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याची भावना येथील कामगारांमध्ये होती.

टाटा मोटर्सच्या कामगारांचा रतन टाटा यांच्याशी २८ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या भेटीचा एक हृद्य सोहळा संपूर्ण देशाने पाहिला आणि ऐकला होता. येथील कामगारांच्या मनात तो प्रसंग अक्षरश: कोरलेला आहे. रतन टाटा यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे निमित्त होते. ‘टाटा साहेबांनी हा वाढदिवस आमच्यासमवेत साजरा करावा’, अशी विनंती कामगारांनी एका पत्राद्वारे टाटा यांना केली होती. तेव्हा अनपेक्षितपणे टाटा यांनी ही विनंती मान्य केली.

कंपनीत येऊन त्यांनी केवळ वाढदिवस साजरा केला नाही तर येथील तब्बल १६ हजार कामगारांची भेट घेतली होती. भेटीच्या दिवशी स्वागतावेळी कंपनीच्या आवारात दुतर्फा उभे राहून कामगारांनी टाटा यांना मानवंदना दिली. खुल्या वाहनातून आलेल्या टाटांना पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी कामगारांची झुंबड उडाली होती. शक्य तितक्या कामगारांशी टाटा संवाद साधत होते. अनेकांची त्यांनी आस्थेने विचारपूस केली. काहींनी हस्तांदोलन केले. काहींनी अलिंगन देऊन आनंद व्यक्त केला.
दुपारचे जेवण टाटा यांनी कामगारांसोबतच केले. कॅन्टीनमध्ये रांगेतून त्यांनी स्वत:साठी अन्नपदार्थ घेतले. समारोपप्रसंगी छोटेखानी सभा झाली. त्यात टाटा यांच्याविषयीच्या आदरयुक्त प्रेमळ भावना कामगारांनी व्यक्त केल्या.

‘देव आम्ही कधी पाहिला नाही. देवांमध्ये असणारे सर्व गुणधर्म रतन टाटा यांच्यात आहेत आणि म्हणूनच ते आम्हाला देवासारखे वाटतात. आमचा देवच आम्हाला आज प्रत्यक्षात भेटला’, अशी भावना कामगारांनी व्यक्त केली, तेव्हा सर्वच भारावून गेले होते.

अशीच एक आठवण आवर्जून सांगितली जाते. कंपनीच्या ‘लेक हाऊस’ मध्ये रतन टाटा नेहमी येत असत. एके दिवशी ते ‘लेक हाऊस’मध्ये आल्याची माहिती कामगारांना समजली. तेव्हा ४० जणांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट मागितली. कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी वेळ दिली.
जवळपास तासभर चाललेल्या या भेटीत टाटा यांनी सर्वांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. ‘तुमचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी तुम्ही मला दिली. कामगार संघटनेने सतत पाठबळ दिले’ याविषयी टाटा यांनी कामगारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आपण सर्वजण मिळून कंपनीला भारतीय बाजारपेठेत सर्वोच्च स्थान मिळवून देऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या भेटीने सर्वांनाच त्यांचा साधेपणा आणि मनाचा मोठेपणा दिसून आला.

औद्योगिक शांततेचा काळ..
पिंपरी-चिंचवड शहरात १९८९ च्या सुमारास औद्योगिक अशांततेचा काळ होता. त्याचा फटका टाटा मोटर्स कंपनीला (तेव्हाची टेल्को कंपनी) बसला होता. तशी संघर्षमय परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, याची पुरेपूर खबरदारी रतन टाटा यांनी घेतली, हे नंतरच्या काळातील त्यांच्या अनेक निर्णयांमधून दिसून आले.
या संघर्षाच्या आणि अडचणीच्या काळात पिंपरी-चिंचवडकरांनी टाटा यांना पूर्णपणे पाठबळ दिले, याची जाणीवही त्यांनी कायम ठेवली. दृश्य, अदृश्य स्वरूपात टाटांनी पिंपरी-चिंचवड शहरासाठी भरपूर मदत केली आहे. अगदी सुरूवातीला पिंपरी पालिकेची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. तेव्हा टाटा यांच्या पुढाकाराने पालिका शाळांना संगणक भेट देण्यात आले. आरोग्याच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या होत्या.

टाटांमुळे उद्योगांचे अर्थाजन..
वाहन उद्योगाचे महत्वाचे केंद्र म्हणूनच पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत, विकासात टाटा मोटर्सचे मोठे योगदान आहे. टाटा मोटर्समुळे हजारो कामगारांना, तंत्रज्ञानांना रोजगार मिळाला. सुटे भाग पुरवणाऱ्या शेकडो स्थानिक कंपन्या तसेच छोटे उद्योगांचे अर्थाजन त्यांच्यामुळेच सुरू आहे. उद्योगनगरी म्हणून सर्वपरिचित असणाऱ्या पिंपरी-चिंचवडचा कणा म्हणूनच टाटा मोटर्सकडे पाहिले जाते.

जेआरडी उड्डाणपूल..
टाटांचे योगदान लक्षात घेऊनच पिंपरी महापालिकेने नाशिकफाटा येथे उभारलेल्या भव्य दुहेरी उड्डाणपुलाचा ‘भारतरत्न जे आर डी टाटा उड्डाणपूल’ असे नाव दिले आणि एकप्रकारे टाटांविषयी कृतज्ञताच व्यक्त केली आहे.

माणुसकी जपणारा उद्योगपती..
भारतीयांच्या मनातला भारतरत्न आणि दैवताच्या रूपात माणुसकी जपणारा उद्योगपती ज्याने उद्योग नव्हे तर कुटुंब उभे केले, असे रतन टाटा गेले, त्याला वर्ष पूर्ण झाले. आजही कामगारांच्या मनात टाटांचा साधेपणा, संवेदनशीलता अशा अनेक हृद्य आठवणी आहेत.