पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनाम्याचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सुपूर्द केले आहे.

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याला भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाने टोळक्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ही घटना चिंचवड येथे घडली होती. याप्रकरणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह इतर सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या सर्व प्रकारामुळे सर्व स्तरातून भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज अनुप मोरे यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
राजीनामा पत्रात अनुप मोरे यांनी म्हटले आहे की, “गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यामुळे आपल्या पार्टीची प्रतिमा मलीन होऊ शकते.”
मोरे यांनी पुढे नमूद केले आहे की, “माझे आई-वडील, माझे कुटुंब आणि मी गेली ४० वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे आणि अविरत करत आहोत. बुथ अध्यक्ष ते भाजयुमो प्रदेशाध्यक्ष या प्रवासात पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला. आमचा परिवार आणि मी सदैव भारतीय जनता पक्षासोबत आहे आणि राहू.”

“भारतीय जनता पक्षाची माझ्यामुळे प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेत आहे. मी सदैव ‘प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी, नंतर स्वतः’ या तत्वावर निष्ठेने कार्य करत राहीन,” असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. दरम्यान त्यांच्या या अचानक राजीनाम्यामुळे युवा मोर्चा संघटनेत मोठी उलथापालथ निर्माण होऊ शकते. त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रणेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार मार्गक्रमण करीत आहे. तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष आणखी मजबूत होत आहे. पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी देखील यात मागे नाहीत. केवळ माझ्यामुळे पक्षहित आणि पक्षश्रेष्ठींच्या कार्यात बाधा नको, याकरिता परिस्थितीचा सारासार विचार करून मी हा निर्णय माझ्या सद्सद् विवेकबुध्दिने घेतलेला आहे. यात कोणाचाही हस्तक्षेप नाही. दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधी यांचे आजपर्यंतच्या सहकार्याबद्दल मी आभार मानतो.धन्यवाद….आपलाच अनुप मोरे….
























Join Our Whatsapp Group