भोसरी (Pclive7.com):- भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीतील बांधकामाच्या ठिकाणी ब्रेकर मशीनच्या सहाय्याने लेव्हल काम सुरू असताना हादऱ्याने शेजारील कंपनीची सुमारे २५ फूट उंच भिंत अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना भोसरी एमआयडीसीतील जे ब्लॉकमध्ये (दि.०६) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली.

मारुती राघोजी भालेराव (वय ३२, रा. रानुबाई मळा, चाकण) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक के. एस. पठारे यांनी याबाबत माहिती दिली. भोसरी एमआयडीसीतील जे ब्लॉकमध्ये एक कंपनी आहे. कंपनीत सध्या काही बांधकाम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी कामगार भालेराव आणि एक जेसीबी चालक यांच्याकडून बांधकामाच्या ठिकाणी ब्रेकर मशीनच्या सहाय्याने लेव्हलींगचे काम सुरू होते.

काम सुरू असताना हादऱ्यामुळे अचानक शेजारी असणाऱ्या एका कंपनीची सुमारे २५ फूट उंच सीमा भिंत आणि शेड कामगार भालेराव यांच्या अंगावर कोसळले. यात भिंतीच्या राडारोड्याखाली सापडल्याने भालेराव हे गंभीर जखमी झाले. हा प्रकार लक्षात येताच जेसीबी चालकाने आरडाओरडा केला. या घटनेबाबत तातडीने पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशामक दलाला कळविण्यात आले.

माहिती मिळताच अग्निशामक दलाचे रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. गंभीर जखमी अवस्थेतील भालेराव यांना त्वरित महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत सध्या अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. तपासात जे काही निष्पन्न होईल त्यानुसार, पुढील कारवाई करण्यात येईल, असे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक के. एस. पठारे यांनी सांगितले.

























Join Our Whatsapp Group