पिंपरी (Pclive7.com):- दि सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नावाखाली आज दि.७ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा बेकायदेशीर सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली असल्याचा आरोप बँकेचे सभासद राजेश रोचीरामानी यांनी केला असून ही सभा बँकेच्या अधिकृत सभासदांनी बोलावलेली नसल्याची तक्रार बँकेचे प्रशासक तथा लिक्विडेटर काळे यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे. तसेच सभासदांची दिशाभूल करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

राजेश रोचीरामानी यांनी तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १२ जून २०२५ रोजी निळू फुले सभागृह, सांगवी येथे अधिकृतपणे सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. या सभेत उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने बँकेचे पुनरुज्जीवित करण्याचा ठराव संमत केला होता. हा ठराव प्रशासकांनी मान्य करून पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठवल्याचेही त्यांनी सांगितले.

मात्र आता काही दिवसांपासून काही लोकांकडून बँकेच्या नावाची बदनामी करणे आणि बँक पुन्हा सुरू करण्यात अडथळे निर्माण करणे सुरू असल्याचा आरोप राजेश रोचीरामानी यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी होणारी प्रस्तावित सभा ही पूर्णपणे बेकायदेशीर असून, याला कोणत्याही अधिकृत सभासदांचा पाठिंबा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आश्चर्याची बाब म्हणजे, या तथाकथित सभेसाठी कोणताही प्रस्ताव सभासदांसमोर ठेवण्यात आलेला नाही, बँकेच्या नोटीस बोर्डवर किंवा वृत्तपत्रात कोणतीही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, असे रोचीरामानी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

ही केवळ सभासदांची व बँकेची फसवणूक आहे. प्रशासकांनी याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा व दिशाभूल करण्याचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा मी स्वतः अधिकृत सभासद म्हणून तक्रार दाखल करेन, व याची संपूर्ण जबाबदारी प्रशासकांची राहील, असा इशारा राजेश रोचीरामानी यांनी दिला आहे.
बँकेचे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून पगारापासून वंचित असून आमचा एकमेव उद्देश आहे की, बँकेच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, त्यांचे थकीत मानधन त्यांना मिळावे आणि बँक पुन्हा पूर्वीपेक्षा अधिक जोमाने व नव्या उत्साहाने सुरू व्हावी, जेणेकरून पिंपरी कॅम्प परिसरातील व्यापारी वर्गाला पूर्वीप्रमाणे भक्कम आर्थिक पाठबळ मिळेल असेही राजेश रोचीरामानी यांनी म्हटले आहे.

























Join Our Whatsapp Group