पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील आर्य समाज संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान शिबिर तसेच जयपूर, राजस्थान येथील स्वामी सच्चिदानंद यांचे प्रवचन व अमृतसर पंजाब येथील पंडित दिनेश आर्य यांचे भजन, २१ कुंडी यज्ञ आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आर्य समाज पिंपरी संस्थेचे मार्गदर्शक मुरलीधर सुंदरानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

यामध्ये शुक्रवारी (दि.१९) पिंपरी कॅम्प येथील संस्थेच्या पटांगणात सकाळी ७:४५ ते १०:१५ आणि सायंकाळी ६ ते ८:१५ होम हवन आणि भजन होणार आहे. मुख्य कार्यक्रम शनिवारी (दि. २०) सायंकाळी ६ वाजता, संत तुकाराम नगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे नाट्यगृह येथे स्वामी सच्चिदानंद यांचे “राष्ट्र निर्माण मे हमारे कर्तव्य” या विषयावर प्रवचन आणि पंडित दिनेश आर्य यांचे भजन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त अधिकारी डॉ. दि. मा. मोरे हे भूषवणार आहेत. यावेळी उत्तम दंडीमे, शकुंतला दंडीमे, लक्ष्मी कलबुर्गी, रमेश वासवानी, वीणा वासवानी, रमेश धर्माणी, मीना धर्माणी, श्रुत चव्हाण, शुभलता चव्हाण, सुरेंद्र संसारे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी व सचिव हरेश तिलोकचंदानी यांनी दिली. तत्पूर्वी सकाळी संस्थेच्या पटांगणात सकाळी ७:४५ ते १०:१५ होम हवन करण्यात येणार आहे.

समारोपाच्या दिवशी आर्य वीर दल पिंपरी च्या वतीने “हुतात्मा स्वामी श्रद्धानंद बलिदान दिवस” निमित्त “भव्य रक्तदान शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास एक इयरबड भेट देण्यात येणार आहे. तत्पूर्वी यज्ञ ब्रम्हा पंडित विवेक शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८:३० ते दुपारी १ वाजेपर्यंत ब्रह्मयज्ञ व देवयज्ञ, भजन, प्रवचन व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनात अतुल आचार्य, दिनेश यादव, उत्तम दंडीमे, जयराम धर्मदासानी, दत्ता सूर्यवंशी, दिगंबर रिद्धीवाडे, संजय वासवानी, नलिनी देशपांडे आदींनी सहभाग घेतला आहे.
संस्थेविषयी अधिक माहिती देताना दिनेश यादव यांनी सांगितले की, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज संस्थेची स्थापना केली. ही संस्था वैदिक धर्म प्रचाराचे कार्य करीत असते. पिंपरी कॅम्प येथे संस्थेच्या वतीने मोफत सुसज्ज, आधुनिक ग्रंथालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी मोफत योगासन, प्राणायाम वर्ग चालविण्यात येतात. वैदिक पद्धतीचे १६ संस्कार आणि विवाह संस्कार साठी पुरोहित उपलब्ध करून देण्यात येतात. आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहन देणे, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून दिले जाते. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी महिलांसाठी व इतर रविवारी सकाळी ८ ते ११ पर्यंत हवन, वेदपाठ, भजन, प्रवचन आदी उपक्रम राबविण्यात येतात.
























Join Our Whatsapp Group