छत्रपती संभाजीनगर (Pclive7.com):- काँग्रेसच्या राजकीय पटावरील अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता अशी ओळख असणारे नेते ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात एक मुले, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. विधिज्ञ म्हणून युक्तीवाद करणाऱ्या शिवराज पाटील चाकुरकर यांनी लातूरच्या नगरपालिकेच्या राजकारणापासून सुरुवात केली. पण ते रमले मात्र दिल्लीमध्ये. १९८० मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर १९९९ पर्यंत सलग सात निवडणुका जिंकत लोकसभेतील एक प्रभावी नेता म्हणून उदयास आले.

इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. १९९१ ते १९९६ या काळात ते देशाचे १० वे लोकसभा अध्यक्ष होते. लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवे ग्रंथालय इमारत यांसारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली.

लातूर जिल्ह्यातील चाकूरमध्ये जन्मलेले चाकूरकर यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. १९६७-६९ या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवले. देश-विदेशातील अनेक संसदीय परिषदांमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्व केले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसपक्षातही त्यांनी जाहीरनामा समितीचे अध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. २००४ मध्ये निवडणूक हरूनही त्यांच्यावर विश्वास ठेवत केंद्रातील गृहमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी ३० नोव्हेंबर २००८ रोजी राजीनामा दिला.

२०१० ते २०१५ या काळात ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्यरत होते. देशातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते. शिवराज पाटील हे सत्य साई बाबांचे निष्ठावंत अनुयायी म्हणूनही परिचित होते. सुमारे पाच दशकांचा संसदीय आणि प्रशासकीय अनुभव, विविध मंत्रालयातील कामकाज आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून केलेले योगदान यामुळे शिवराज पाटील हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व मानले जात. काँग्रेस नेत्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या चर्चांमध्ये ते सहभागी असत. त्यामुळे काँग्रेसच्या किचन कॅबिनेटमध्ये ते होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात नेहमी असे. गेल्या काही वर्षापासून ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले होते. त्यांनी गीतेचा अभ्यास केला. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभूत्त्व होते.

























Join Our Whatsapp Group