आळंदी (Pclive7.com):- होळीच्या मंगलमय आणि रंगोत्सवी वातावरणात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर येथे यंदा आकर्षक सूर्यफुलांच्या भव्य पुष्पसजावटीने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साकारलेली ही अनोखी आरास भक्तांसाठी प्रमुख आकर्षण ठरली.

मंदिराच्या गाभाऱ्यात आणि परिसरात हजारो झगमगत्या पिवळ्या सूर्यफुलांची सजावट करण्यात आली होती. या देखण्या आरासीतून संपूर्ण परिसर प्रसन्नता आणि चैतन्याने उजळून निघाला. पारंपरिक फुलांसह सूर्यफुलांचा कल्पकतेने वापर करून निसर्ग आणि भक्तीभाव यांचा सुंदर संगम साधण्यात आला होता. अनेक भाविकांनी या सजावटीचे कौतुक करत ती मनाला आनंद देणारी असल्याची भावना व्यक्त केली.
होळी निमित्त सकाळपासून अभिषेक, कीर्तन आणि हरिनाम संकीर्तनाचे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर प्रशासनाच्या वतीने दर्शनरांगांची योग्य नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आल्याने भाविकांना सुलभ दर्शन घेता आले.
सूर्यफुलांच्या या आकर्षक आरासीतून ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थळाला एक वेगळेच तेज प्राप्त झाले असून, भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात होळीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.





















Join Our Whatsapp Group