
‘जो बोले सो निहाल…’ घोषणांनी गुरुद्वारा परिसर दणाणला..!
आकुर्डी (Pclive7.com):- सकल हिंदू समाजाने आपली महनीय संस्कृती परंपरा, गौरवशाली इतिहास समजून घेतला पाहिजे. या स्वबोधासह शत्रूबोध लक्षात घेणे देखील आवश्यक असून जाती पाती विसरून सकल हिंदू समाज या नात्याने धर्म जागृतीसाठी कायम तत्पर राहण्याचे आवाहन प्रसिद्ध लेखक, व्याख्याते भरत अमदापुरे यांनी केले. ते आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरातील गुरुद्वारा वस्ती परिसरातील सकल हिंदू समाज आयोजित भव्य हिंदू संमेलनात ते बोलत होते.

‘जो बोले सो निहाल.. सत श्री अकाल’, भारत माता की जय, जय श्रीराम, जय जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी गुरुद्वारा परिसर दणाणला होता. व्यासपीठावर संत तुकाराम महाराजांचे वंशज, युवा कीर्तनकार ह.भ.प.अनिकेत महाराज मोरे, गुरुद्वारा परिसर हिंदू संमेलन समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष चोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतांना भरत अमदापुरे यांनी युवकांनी आपल्या भारताचा गौरवशाली इतिहास समजून घेऊन राष्ट्रावर आक्रमण केलेल्या शत्रूविषयी जागृती ठेवली पाहिजे. मंदिरे सरकारमुक्त झाली पाहिजे. मंदिराचे व्यवस्थापन स्वतंत्र हवे असे परखड मत त्यांनी मांडले. सध्या समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्या कुटुंबात आपल्या धर्माचे, भारतीय संस्कृती परंपरेचे संस्कार हवे, आपली कुटुंब व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून कुटुंबव्यवस्था संस्कारी, मजबूत राहिली तर देश देखील मजबुतीने उभा राहील. प्रत्येकाने पर्यावरणाचे भान राखून जातीपातीच्या बाहेर येऊन अवघा हिंदू बंधू बंधू या भूमिकेतून एकत्रित आले पाहिजे असे सांगितले.

ह. भ. प.अनिकेत मोरे महाराज यांनी सकल हिंदू एकत्रीकरणामागची भूमिका विषद करून तरुणांनी धर्म कार्य समजून जागृतीसाठी कायम तत्पर राहण्याचे आवाहन केले. अध्यक्ष संतोष चोरे यांनी अशा संमेलनाची गरज निर्माण झाली असल्याचे सांगून सर्व संस्था संघटना यांनी सकल हिंदू समाजासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कलावर्धिनी डान्स कंपनीच्या सौ. सायली काणे आणि कलाश्री नृत्यशाळा संस्थेच्या त्यांच्या शिष्या ईश्वरी, याज्ञिकी, स्वरा, उन्नती ह्यांनी सादरीकरण केले. त्याचबरोबर मैदानी खेळाचे प्रात्यक्षिके झाली. कार्यक्रमाला गुरुद्वारा परिसरातील मातृशक्ती, युवा वर्ग मोठ्या संख्येने एकवटला होता. कार्यक्रमप्रसंगी सांस्कृतिक वार्तापत्राच्या संघ यात्रा विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माळी तर आभार चैतन्य पंडित यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सकल हिंदू समाज गुरुद्वारा परिसर तसेच परिसरातील विविध धार्मिक, सामाजिक संघटनांनी परिश्रम घेतले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. गुरुद्वारा परिसर भगव्या पताका, झेंड्यांनी भगवामय झाला होता.






















Join Our Whatsapp Group