पिंपरी (Pclive7.com):- दापोडी येथील ग्रामदैवत फिरंगाई देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्तखज सोमवार (दि.३०) आणि उद्या मंगळवारी (दि.३१) परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दापोडी परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि जनसामान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने मार्गांमध्ये तात्पुरते बदल केले आहेत.

वाहतुकीत करण्यात आलेले बदल खालील प्रमाणे..
१. संविधान चौक बोपोडी कडून दापोडी गावठाण कडे ये-जा करण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- सदरची वाहने हॅरिषब्रीज मार्गे इच्छित स्थळी जातील.
२. शितळा देवी चौक दापोडी येथे ये-जा करण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- सदरची वाहने पिंपळे गुरव मार्गे व फुगेवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील,
३. सांगवीकडून दापोडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे ये-जा करण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- सदरची वाहने शितळादेवी चौकातुन डावीकडे वळुन फुगेवाडी चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. हे बदल सोमवार आणि मंगळवारी सकाळी १०.०० वाजल्यापासून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत लागू राहतील. मात्र, रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून वगळण्यात आले आहे.
यात्रेच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आणि अधिसूचनेत नमूद केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group