पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर किरकोळ वादातून भीषण हत्येची घटना घडली आहे. दोन कामगारांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले असून, एका कामगाराने संतापाच्या भरात सहकाऱ्याला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. या घटनेत २६ वर्षीय केशव कुमार महतो याचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बांधकाम साइटवर केशव महतो आणि आरोपी कामगार एकत्र काम करत होते. कामाच्या दरम्यान दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद वाढत जाऊन संतापाच्या भरात आरोपीने केशवला इमारतीवरून खाली ढकलले. उंचावरून खाली कोसळल्याने त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, बांधकाम मजुरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या हत्येमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






















Join Our Whatsapp Group