पिंपरी (Pclive7.com):- शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर टीमने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचे धागेदोरे थेट बँकॉक आणि म्यानमारमधील कुप्रसिद्ध सायबर कॉल सेंटर्सपर्यंत पोहोचले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्लेसमेंट व इंटर्नशिप देणाऱ्या कंपनीच्या मालकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होते. विविध कारणे सांगत सायबर भामट्यांनी त्यांच्याकडून तब्बल २ कोटी ९ लाख ३० हजार ५३७ रुपये उकळले. परतावा न मिळाल्याने संबंधित व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तपासादरम्यान सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एका संशयास्पद खात्याची माहिती समोर आली. हे खाते ‘आर्शिल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने नवी मुंबईत उघडण्यात आले होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तुर्भे परिसरातून सुशील भगवान जुवाटकर याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हे खाते आपल्या साथीदार पंकज राज कपूर आणि निश्चल टंकबीर बरेयली यांच्या सांगण्यावरून उघडल्याची कबुली दिली. पुढील तपासात उघड झाले की, पंकज कपूर आणि निश्चल बरेयली यांनी यापूर्वी बँकॉक व म्यानमारमधील सायबर फसवणूक कॉल सेंटर्समध्ये काम केले होते. त्याच अनुभवाच्या आधारे ते नवी मुंबईत नवीन कॉल सेंटर सुरू करण्याच्या तयारीत होते.
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ६ मोबाईल फोन, २ लॅपटॉप, ३ पासपोर्ट, ३ पॉस मशीन, २४ विविध बँक खात्यांचे किट्स, १२ बनावट शिक्के आणि २ हार्डडिस्क असा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करत फिर्यादीचे ६२ लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये होल्ड करण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे व त्यांचे पथक करत आहे.






















Join Our Whatsapp Group