पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या ठरावामध्ये आपल्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त तसेच स्थायी समिती सभापती यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. संबंधित प्रकरणातील ठराव तात्काळ रद्द करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

संदीप वाघेरे यांनी म्हटले आहे की, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये शिक्षण समिती सभा ठराव क्रमांक ७ (दिनांक ०२/०४/२०२६) अन्वये नगरसचिव कार्यालयामार्फत सादर करण्यात आलेल्या डॉकेटनुसार नगरसेवक संदीप वाघेरे यांचे नाव “सूचक” म्हणून तर विकास साने यांचे नाव “अनुमोदक” म्हणून नोंदविण्यात आले होते.
मात्र, आपण सदर विषयास कोणतीही संमती दिलेली नसून कोणताही ठराव सुचविलेला नाही, असे स्पष्ट करत वाघेरे यांनी नगरसचिव कार्यालयाकडून दिशाभूल झाल्याचा आरोप केला आहे. आपल्या नावाची करण्यात आलेली नोंद तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

याशिवाय संबंधित विषयात यंत्रमाग आणि जगदंब या दोन्ही संस्था शासनाच्या असतानाही जगदंब संस्थेच्या दरामध्ये मोठी तफावत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर प्रति विद्यार्थी आणि प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा वाढत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
नगरसेवक संदीप वाघेरे यांनी प्रशासनाकडे स्थायी समिती ठराव क्रमांक ३६६, विषय क्रमांक ७ तात्काळ रद्द करणे, त्यांच्या नावाची चुकीची नोंद हटविणे तसेच संबंधित नगरसचिव आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Tags: Sandeep Waghere




















Join Our Whatsapp Group