पिंपरी (Pclive7.com):- चाकण परिसरातील खराबवाडी येथे एका मेडिकल दुकानात घडलेल्या अजब चोरीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चोरट्यांनी दुकानातील महागडी औषधे सोडून कंडोम, कॅडबरी चॉकलेट्स आणि झंडू बामचे बॉक्स चोरून नेल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खराबवाडी येथील माही मेडिकल या दुकानात पहाटे साडेचारच्या सुमारास चोरीची घटना घडली. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील काही रोकडसह विविध साहित्य लंपास केले. मात्र, त्यांनी विशेषतः कंडोम, कॅडबरी आणि झंडू बामचे बॉक्स चोरून नेल्याचे समोर आले आहे.

ही संपूर्ण घटना दुकानात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पहाटेच्या शांततेचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केल्याचे दिसून येत आहे. या अनोख्या चोरीच्या प्रकारामुळे परिसरात चर्चांना उधाण आले असून, नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.




















Join Our Whatsapp Group