पिंपरी (Pclive7.com):- आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे यांची मोशी परिसरात धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रात्री घडली. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोशी येथील युवराज रेस्टॉरंट अँड बार येथे रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास अनिल मोरे यांच्यावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात आरपीआय कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

दरम्यान, अनिल मोरे यांच्या पार्थिवावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. “जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असा इशारा आरपीआय कामगार आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात असून आरोपींचा शोध सुरू आहे.




















Join Our Whatsapp Group