पिंपरी (Pclive7.com):- “सत्तेसाठी नाही, तर सर्वसामान्यांच्या सेवेसाठी” हे ब्रीदवाक्य घेऊन लोकसेवक युवराज दाखले यांनी “शिवशाही शासन” या नव्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची प्रेरणा आणि आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समतेच्या विचारातून हा पक्ष उभा राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई येथे झालेल्या घोषणेत युवराज दाखले म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्थापित पक्षांनी गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार, मातंग, बहुजन समाज, तृतीयपंथी भगिनी आणि व्यापारी वर्गाचा केवळ मतांसाठी वापर केला. शिक्षणाचे वाढते बाजारीकरण, बेरोजगारी आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे महाराष्ट्रातील सामान्य नागरिक त्रस्त झाला असून, वंचित समाजाला सत्तेत योग्य प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी “शिवशाही शासन” पक्ष मैदानात उतरला आहे.

पक्षाने आपली ५ सूत्री भूमिका जाहीर केली असून त्यामध्ये शिक्षण, रोजगार, स्वच्छता व आरोग्य, शेतकरी-कामगार-व्यापारी हित आणि वंचित समाजाच्या स्वाभिमानाला प्राधान्य देण्यात आले आहे. खासगी क्लासेसच्या लुटीला आळा घालणे, सरकारी शाळा सक्षम करणे, SC/ST/OBC/NT/VJNT विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण, प्रत्येक घरात रोजगार, तृतीयपंथी, विधवा व दिव्यांगांसाठी विशेष योजना, तसेच “नालामुक्त-रोगमुक्त महाराष्ट्र” अभियान राबविण्याची घोषणा करण्यात आली.

याशिवाय शेतमालाला हमीभाव, कामगारांना किमान २५ हजार रुपये वेतन आणि व्यापाऱ्यांवरील जाचक अटी रद्द करण्याचे आश्वासनही पक्षाने दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर पक्षाची वाटचाल असेल, असेही युवराज दाखले यांनी स्पष्ट केले.

“हा पक्ष नेत्यांचा नाही, तर कार्यकर्ते आणि जनतेचा असेल. ‘शिवशाही शासन’ म्हणजे सेवेचे शासन,” असे सांगत त्यांनी पक्षाचे चिन्ह आणि निशाणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
“जो वंचितांच्या बाजूने उभा राहील, तोच शिवशाही शासनाचा सच्चा सैनिक असेल. आता महाराष्ट्रात एकच नारा — जय शिवराय, जय लहुजी!” अशा घोषणांनी कार्यक्रमाचा समारोप झाला.




















Join Our Whatsapp Group