पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील रुग्णालयाला विविध समस्यांनी अक्षरशः ग्रासले असून, उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पार्किंगची अपुरी व्यवस्था, वारंवार होणारी पाणी टंचाई, स्वच्छतागृहांची दुरवस्था तसेच कॅन्टीन सुविधेचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात सुमारे 340 बेडची सुविधा असून दररोज 1200 हून अधिक रुग्ण ओपीडीसाठी येतात. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतानाही रुग्णालय परिसरात पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

याशिवाय रुग्णालयातील पाण्याच्या पाइपलाईनची वारंवार गळती होत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचत असून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्वच्छतागृहांची देखील दयनीय अवस्था झाल्याचे दिसून आले आहे. रुग्ण आणि नातेवाईकांकडून स्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

रुग्णालयात कॅन्टीन सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना खाण्या-पिण्यासाठी बाहेर धावपळ करावी लागत आहे. विशेषतः लांबून येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. दरम्यान, थेरगाव रुग्णालयातील या मूलभूत समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी रुग्ण आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group