पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात मोठा खुलासा केला असून, या गुन्ह्याचे धागेदोरे थेट लॉरेन्स बिष्णोई गँगपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. गुंडा विरोधी पथकाने अटक केलेल्या तिन्ही आरोपींच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण रामनिवास पंकज, कुलदीप राठी आणि सागर अजय पाल यांना या गुन्ह्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांना हरियाणातील सोनपत येथे नेऊन प्रत्यक्ष पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच, बिष्णोई गँगकडून आरोपींना पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि आर्थिक मदतही पुरवण्यात आली होती. आरोपींच्या बँक खात्यात ५० हजार रुपये वर्ग करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या संपूर्ण कटामागे आरजू बिष्णोई नावाच्या व्यक्तीचा सहभाग असल्याची माहिती समोर आली असून, काम पूर्ण झाल्यानंतर आरोपींना अडीच लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पोलिस तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. आरोपींचा बिष्णोई टोळीशी संपर्क सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला होता. इंस्टाग्रामवरून प्रथम संपर्क साधल्यानंतर, पोलिसांची नजर चुकवण्यासाठी आरोपींनी ‘सिग्नल’ या एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲपचा वापर सुरू केला होता.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील ए.जे. फर्निचर मॉलवर झालेल्या फायरिंग प्रकरणालाही या तपासामुळे नवे वळण मिळाले आहे. मॉलचे मालक अशोक कुमार बिश्नोई यांना आरजू बिष्णोईने सोशल मीडियावरून धमकीची पोस्ट केली होती. त्यात ड्रग्ज आणि हवाला व्यवसाय बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता.

मात्र, पोलिसांनी सोशल मीडियावरील दाव्यांबाबत सावध भूमिका घेतली आहे. “सोशल मीडियावरील पोस्ट किंवा दाव्यांवर थेट विश्वास ठेवला जाणार नाही. तपास केवळ कायदेशीर आणि वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारेच केला जाईल,” असे सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर यांनी स्पष्ट केले. या हायप्रोफाइल खंडणी प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू असून, यात आणखी काही स्थानिक आरोपी तसेच मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group