पुणे (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी आज अटक केली. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. मात्र काल हा जामीन नामंजूर झाल्यानंतर आज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी काही कीर्तनकार, धार्मिक गुरु आणि प्रवचनकारांची यादी जाहीर करत वारकरी संप्रदायात घुसखोरी होत असल्याचा आरोप केला होता. या यादीत संग्राम भंडारे यांचेही नाव असल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

यानंतर संग्राम भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केली होती. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी भंडारेंना अटक करण्यात आली नसल्याने लवांडे सातत्याने प्रश्न उपस्थित करत होते. दरम्यान, लवांडे यांच्या वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार एका महिलेकडून दाखल करण्यात आली होती. त्याच प्रकरणात आता ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, विकास लवांडे यांना अटक होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच संग्राम भंडारे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत “लवांडे यांना अटक कधी होणार?” असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच पोलिसांनी लवांडेंना अटक केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.




















Join Our Whatsapp Group