पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाणी उचलण्यात येत असलेल्या पवना नदीमध्ये मैलामिश्रित, रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. जनावारांचे मांसही नदीपात्रात आढळत आहे. नदीतील पाणी अतिशय दूषित असून पिण्यायोग्य नसल्याचा रिपोर्ट प्रयोगशाळेने दिला आहे. हे पाणी पिल्याने नागरिकांना विविध आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मार्गी लागणे अतिशय आवश्यक आहे. याबाबत स्थानिक नागरिक, आजी-माजी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. शहरातील पाण्याची परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पवना बंदिस्त प्रकल्प जलवाहिनी मार्गी लावण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्याची विनंती केली आहे. मावळातील स्थानिक नागरिक, शेतकरी यांचे काही प्रश्न आहेत. ते जाणून घ्यावेत. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, आंदोलक, विविध संघटनांनाबरोबर संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढावा, असे खासदार बारणे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनाही याबाबतचे निवेदन दिले आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३२ लाखांवर पोहोचली आहे. शहर चारही बाजूने विस्तारत असून झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणी अपुरे पडत आहे. महापालिका पवना नदीतील रावेत बंधाऱ्यातून एका दिवसाला ५५० एमएलडी पाणी उचलत आहे. हे पाणी अतिशय अशुद्ध आहे. नदीमध्ये मैलामिश्रित, रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. जनावारांचे मांसही नदीपात्रात आढळत आहे. त्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. प्रयोगशाळेनीही तसा अहवाल दिला आहे. पवना नदी मृत झाली आहे.

आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीतील निघोजे बंधाऱ्यातून उचलले जाते. हे पाणीही अतिशय अशुद्ध आहे. दोन्ही नदीतून उचलण्यात येणारे पाणी अशुद्ध आहे. हे पिण्यायोग्य राहिले नाही. हे पाणी शुद्ध करुन नागरिकांना वितरित केले जाते. परंतु, हे पाणी पिल्याने नागरिकांना विविध वैद्यकीय आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे पाणी पिल्याने जीवितहानीही होऊ शकते. नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. त्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी योजना करणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी बाधित शेतकरी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध संघटनांना विश्वासात घ्यावे. चर्चेतून तोडगा काढावा. बंदिस्त जलवाहिनी झाल्यास शुद्ध आणि वाढीव पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिकांना पुरेसे, मुबलक पाणी उपलब्ध होईल. पाणी टंचाईच्या तक्रारींमध्ये घट होईल, असेही खासदार बारणे म्हणाले.

बंदिस्त जलवाहिनीअभावी बाराही महिने नदीतील पाणी..
लवादाने चार महिनेच नदीतून पाणी उचलण्यास परवागी दिली आहे. उर्वरित आठ महिने बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी उचलणे बंधनकारक आहे. परंतु, बंदिस्त जलवाहिनी झाली नाही. त्यामुळे बाराही महिने नदीतूनच पाणी उचलावे लागत आहे. नदीतून उचलण्यात येणारे पाणी अतिशय अशुद्ध असते. त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा होतो, याकडेही खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले.
पवना नदीतील पाणी अतिशय अशुद्ध आहे. हे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. सर्वांशी सखोल चर्चा करुन यातून तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
– श्रीरंग बारणे, खासदार मावळ




















Join Our Whatsapp Group