पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आक्रमक, आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारीसाठी पक्ष नेतृत्वाकडे अधिकृत मागणी केली आहे. पुणे महानगर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी बाकावर असताना पक्षाची भूमिका आक्रमकपणे आणि ठामपणे मांडण्यात संदीप वाघेरे नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. विविध नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी सभागृहात सातत्याने आवाज उठवत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. त्यांच्या याच प्रभावी आणि संघर्षशील भूमिकेच्या जोरावर त्यांनी पक्षाकडे विधान परिषदेच्या उमेदवारीची मागणी केली असल्याचे बोलले जात आहे.

संदीप वाघेरे हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत दुसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक असून नुकतेच त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपमध्ये असतानाही अजित पवार यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आणि विश्वासाचे नाते कायम असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते.

दरम्यान, संदीप वाघेरे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यास पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी उभारी मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. तो पुन्हा काबीज करण्यासाठी विधान परिषद ही मोठी राजकीय संधी ठरू शकते, असे मत स्वतः संदीप वाघेरे यांनी व्यक्त केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची उभारणी, विकास आणि शहराचा नावलौकिक वाढविण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या शहराला मूर्त स्वरूप दिले, असेही वाघेरे यांनी नमूद केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा बळकट करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून विधान परिषदेत आक्रमक आणि प्रभावी चेहरा म्हणून संदीप वाघेरे यांना संधी मिळणार का? याबाबत आता राजकीय चर्चांना वेग आला आहे.




















Join Our Whatsapp Group