सामाजिक वास्तवावर भाष्य अन् व्यवस्थेवर कडक ताशेरे!
– बाळासाहेब जवळकर –
पिंपरी (Pclive7.com):- ‘देऊळबंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव मोहीते’, ‘धर्मवीर २’ यासारख्या सुपरहीट सिनेमांचे यशस्वी लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांचा ‘देऊळबंद २’ हा सिनेमा गुरूवारी (२१ मे) सर्वत्र प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे पहिल्याच दिवसापासून, अगदी सकाळच्या पहिल्या खेळापासूनच सगळीकडे रसिक प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. मराठी सिनेमांच्या बाबतीत असे दृश्य दुर्मिळच मानले जाते.

अकरा वर्षापूर्वी ‘देऊळबंद’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला, त्यात ‘विज्ञान विरूध्द अध्यात्म’ असा आशय होता. नास्तिक शास्त्रज्ञ राघव शास्त्री झालेला गश्मीर महाजनी आणि स्वामी समर्थांची भूमिका जीवंत करणाऱ्या मोहन जोशी यांच्यातील जुगलबंदी आणि वैचारिक संघर्षावर आधारित असणारा हा सिनेमा तेव्हा प्रेक्षकांना खूपच आवडला होता. आता ‘देऊळबंद २’ या सिनेमात, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची नास्तिक पत्नी ही थेट देवाचीच परिक्षा घेते, असा नवा विषय आहे. अत्यंत प्रभावीपणे तो सिनेमात मांडण्यात आला आहे.

पहिल्या भागाप्रमाणेच अध्यात्म आणि वास्तववाद यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न येथे दिसतो. ‘अध्यात्म विरूध्द शेती’ हा लढा पहायला मिळतो. शेतकऱ्यांच्या अस्तित्वाशी संबंधित प्रश्नांशी हा सिनेमा भिडतो. श्री स्वामी समर्थांच्या भक्तांना ‘देऊळबंद’ प्रमाणे हा सिनेमा देखील आवडणारच आहे, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. त्याचप्रमाणे, इतरही सिनेमाप्रेमींना देखील तो आवडेल, हे खात्रीने सांगता येईल. स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांनी ‘देऊळबंद २’ पूर्णपणे व्यापून टाकला आहे. मोठ्या पडद्यावर प्रथमच मुख्य भूमिकेत दिसलेल्या स्नेहल यांनी, आपल्या अभिनयाची क्षमता दाखवून दिली आहे. नास्तिकता, संतप्त भावना आणि आतून कोसळलेल्या शेतकरी पत्नीचे भावविश्व त्यांनी अत्यंत प्रभावीपणे उभे केले आहे. तर, मोहन जोशी यांची स्वामी समर्थांची भूमिका केवळ भक्तिभाव निर्माण करत नाही, तर प्रसंगानुसार आश्वासकही वाटते. या दोघांनी कमाल केली आहे. त्यांच्यातील जुगलबंदीचे प्रसंग कधी विनोदनिर्मिती करतात. तर कधी भावनाविवशही करतात.

सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी प्रवीण तरडे यांच्या खांद्यावर होती. त्यात भर म्हणजे तरडे यांनी, स्वत:च्या रांगड्या, बेफिकीर शैलीतील ‘सदूशेठ’ दमदारपणे साकारला आहे. याशिवाय, मंगेश देसाई, महेश मांजरेकर, प्रसाद ओक, ओम भूतकर, संस्कृती बालगुडे, केदार सोमण, क्षितीश दाते, देवेंद्र गायकवाड, रमेश परदेशी, जगन्नाथ निवंगुणे, सुनील अभ्यंकर, विनोद वणवे, सविता मालपेकर, मुकुंद वसुले, अतुल कुडले, सुनील पालकर, हृषीकेश वांबुरकर, पवन पोटे, अर्पिता घोगरदरे अशा अनेक कलाकारांनी आपापली भूमिका समर्थपणे साकारली आहे. अगदी शेवटच्या क्षणी गश्मीर महाजनी यांची छोटीशी भूमिका व त्याला जोडून एक महत्वपूर्ण घोषणा सिनेमात आहे. सिनेमात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय केंद्रस्थानी आहे. हतबल शेतकरी, विविध मार्गाने होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, प्रशासकीय भ्रष्ट व्यवस्थेकडून होणारी फसवणूक, सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष, यासह विशिष्ट समाजातील शेतकरीच आत्महत्या का करतात, लग्न लावून देताना खोट्या प्रतिष्ठेसाठी होणारी वारेमाप उधळपट्टी व त्यापायी होणारे कर्ज अशा अनेक मुद्द्यांवर सिनेमात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. म्हणूनच सिनेमाची कथा प्रेक्षकांना भावनिक पातळीवरही जोडते. सिनेमातील काही प्रसंग अस्वस्थ करणारे आहेत. तर, काही प्रसंग काळीज पिळवटून टाकणारे आहेत.

प्रवीण तरडे यांचे संवाद धारदार आहेत. अनेक संवादात ते सूचक, परखड भाष्य करतात. वेळप्रसंगी व्यवस्थेवर कडक ताशेरे ओढतात. हिंदू-मुस्लीम सामाजिक सलोखा दाखवून देणारे संवाद दाद मिळवून जातात. काही संवाद विचार करायला भाग पाडतात. ग्रामीण वास्तव टिपणारे छायांकन आणि प्रसंगानुसार पार्श्वसंगीत सिनेमाचा प्रभाव वाढवतात. सरतेशेवटी असणारे ‘खंडेराया’चे गाणे सर्वार्थाने उत्तम झाले आहे. काही प्रेक्षकांना सिनेमा श्रद्धेला बळ देणारा वाटू शकतो. तर काहींना तो अंधश्रद्धेकडे झुकणारा वाटू शकतो. सोशल मीडियावरही या मुद्द्यावर मिश्र प्रतिक्रिया दिसतात. सिनेमा तीन तासांचा आहे. ही लांबी कथेला मारक ठरू शकते. काही प्रसंग अनावश्यक वाटतात. संपादन अधिक टोकदार झाले असते, तर कथानकाचा वेग अधिक असता. काही प्रसंगात भावनिकता अतिनाट्यमय वाटते. इतरही काही उणीवा जाणवतात. तरीही ‘तरडे पॅटर्न’चा हा सिनेमा चांगला जमून आला आहे. तो नक्कीच पाहिला पाहिजे.
‘देऊळबंद २’ हा केवळ श्रद्धेचा सिनेमा नाही. तर तो वास्तवाकडे नेणारा सिनेमा आहे. शेतीविषयक समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारी यंत्रणेची अकार्यक्षमता, संवेदनाहीनता आणि हतबल शेतकऱ्यांची असहायता यावर भाष्य करणारा हृदयद्रावक अनुभव आहे. अध्यात्म विरुद्ध वास्तवाचा संघर्ष दर्शविणारा, भक्तीच्या चौकटीतून शेतकऱ्यांच्या वेदना व्यक्त करणारा हा सिनेमा आहे. शेतकरी आत्महत्यांचा विषय असला तरी तो सहानुभूती मिळवण्यासाठी नाही. तर तो समाजातील संवेदनाहीनता दाखवून देतो. सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस हा सिनेमा करतो. समाजातील वास्तवावर बोट ठेवतानाच धारदार शब्दांचे प्रहारही करतो.




















Join Our Whatsapp Group