पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी दुपारनंतर अचानक वातावरणात मोठा बदल झाला. सायंकाळचे चार वाजताच शहरावर काळ्या ढगांनी दाटी केली आणि अक्षरशः अंधारमय वातावरण निर्माण झाले. त्यानंतर काही क्षणांतच धो-धो पावसाला सुरुवात झाली.

गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. भरदुपारी ढग दाटून येत असले तरी पाऊस मात्र हुलकावणी देत होता. त्यामुळे नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर आज जोरदार पावसाने हजेरी लावत शहरवासीयांना दिलासा दिला.

अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहनचालक आणि पादचारी यांची तारांबळ उडाली. काही नागरिकांना दुकानांच्या आडोशाला थांबावे लागले, तर रस्त्यांवरही वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, वातावरणातील गारवा वाढल्याने उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून आगामी काही दिवसांतही पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.




















Join Our Whatsapp Group