पिंपरी (Pclive7.com):- यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात पिंपरी-चिंचवड शहरातील तापमानाने उच्चांक गाठल्याने नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. वाढते शहरीकरण, रस्ते रुंदीकरण, मेट्रो प्रकल्प, विविध विकासकामे आणि सततच्या खोदकामांमुळे शहरातील हिरवळ झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र समोर आले आहे. विकासाच्या नावाखाली मागील सहा वर्षांत तब्बल २१ हजार ३३८ झाडांची अधिकृत कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महापालिकेने मागील सात वर्षांत ९ लाख ६४ हजार ११७ झाडांचे रोपण केल्याचा दावा केला असला, तरी त्यापैकी प्रत्यक्षात किती झाडे जिवंत आहेत, याची स्पष्ट माहिती उद्यान विभागाकडे उपलब्ध नाही. विशेष म्हणजे २०१९ मध्ये करण्यात आलेल्या वृक्षगणनेचा अहवालही अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या वृक्षलागवडीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरवर्षी सुमारे सव्वा लाख झाडांची लागवड केली जात असली, तरी दुसरीकडे परवानगीने आणि विनापरवाना हजारो झाडांची तोड सुरूच असल्याने शहराची नैसर्गिक हिरवाई नष्ट होत चालली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार शहरात सध्या ३२ लाख १६ हजार ७९९ झाडे असल्याचा दावा केला जातोय. मात्र त्यातील किती झाडे प्रत्यक्षात अस्तित्वात आणि जिवंत आहेत, याची ठोस माहिती उपलब्ध नाही.

पर्यावरणप्रेमींनी विदेशी वृक्षांच्या वाढत्या प्रमाणाबाबतही चिंता व्यक्त केली आहे. शहरात पिंपळ, वड, चिंच यांसारख्या देशी वृक्षांऐवजी गुलमोहर, निलगिरी, रेन ट्री यांसारख्या विदेशी झाडांची संख्या वाढत आहे. ही झाडे जमिनीतील पाणी मोठ्या प्रमाणात शोषून घेतात तसेच वादळी पाऊस किंवा वाऱ्यात सहज उन्मळून पडतात. त्यामुळे पर्यावरण संतुलनावर परिणाम होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

शहराचे पर्यावरण आणि तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी आगामी पावसाळ्यात कडुनिंब, जांभूळ, चिंच, आंबा यांसारख्या स्थानिक आणि देशी वृक्षांच्या लागवडीला प्राधान्य देण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
दरम्यान, विकासकामांसाठी काही प्रमाणात वृक्षतोड अपरिहार्य असली तरी अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात पोलिसांत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतात, अशी माहिती मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांनी दिली.




















Join Our Whatsapp Group