पिंपरी (Pclive7.com):- भक्ती शक्ती उड्डाणपूलाखाली श्रीकृष्ण मंदिर ते निगडी गावठाण मुंबई-पुणे महामार्ग परिसरात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान जेसीबी मशीनने खोदकाम करताना (दि.२७) रोजी रात्री पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे हजारो लिटर पाणी वाया गेले असून परिसरातील पाणीपुरवठा काही काळासाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

या घटनेचा फटका निगडी गावठाण, यमुनानगर, साईनाथनगर, लक्ष्मीनगर आदी भागातील नागरिकांना बसला. अचानक पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे संबंधित मेट्रो रेल्वे ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. “निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान अनेक वेळा पाणी पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असून नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
नागरिकांनीही मेट्रो प्रकल्पाच्या कामांदरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.




















Join Our Whatsapp Group